आज (रविवार, 7 सप्टेंबर) 2025 या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार, हे चंद्रग्रहण रात्री 9.58 वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री 1.26 वाजता संपेल. चंद्रग्रहण ही अद्भुत खगोलीय घटना असते. परंतु त्याबद्दल अनेक प्रकारचे समज-गैरसमज प्रचलित आहेत. चंद्रग्रहणाबद्दल अनेक अंधश्रद्धाही आहेत. याबद्दल विज्ञान काय म्हणतं, ते जाणून घेऊयात..
1- गैरसमज: ग्रहण काळात गर्भवती महिला घराबाहेर पडली तर बाळावर डाग किंवा कटचे निशाण पडतील.
विज्ञान काय म्हणतं?- याबद्दल कोणतेच वैज्ञानिक पुरावे नाहीत. बाळाची शारीरिक रचना ग्रहणाने नाही तर गर्भाशयातील डीएनए आणि विकास प्रक्रियेद्वारे निश्चित होते.
2. गैरसमज: ग्रहण काळात अन्न शिजवल्याने किंवा खाल्ल्याने विष पसरतं.
विज्ञान काय म्हणतं?- ग्रहणाचा अन्नावर कोणताही परिणाम होत नाही. पूर्वी लोक अन्न वाचवण्यासाठी खबरदारी घेत असत, कारण त्या काळात रेफ्रिजरेटची सोय नव्हती. त्यामुळे फ्रिजशिवाय अन्न लवकर खराब व्हायचं. त्यामुळे ही धारणा निर्माण झाली.
3. गैरसमज: ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर डोळ्यांना ईजा होते.
विज्ञान काय म्हणतं?- सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो. सोलार फिल्टरशिवाय ते पाहू नये, असा सल्ला दिला जातो. परंतु चंद्रग्रहण पूर्णपणे सुरक्षित आहे, ते उघड्या डोळ्यांनी देखील पाहता येतं.
4. गैरसमज: ग्रहण काळात घरातील साठवलेलं पाणी आणि झाडं दूषित होतात.
विज्ञान काय म्हणतं?- ग्रहणाचा घरातील पाण्यावर किंवा झाडांवर कोणताच परिणाम होत नाही. ही सर्व अंधश्रद्धा आहे.
5. गैरसमज: ग्रहण काळात प्रार्थना न करणं किंवा स्नान न करणं हे पाप आहे.
विज्ञान काय म्हणतं?- ही केवळ एक धार्मिक श्रद्धा आहे, वैज्ञानिकदृष्ट्या ग्रहणाचा मानवी कृतींशी काहीही संबंध नाही.
6- गैरसमज: ग्रहणामुळे पृथ्वीवर नैसर्गिक आपत्ती (भूकंप, पूर इत्यादी..) येतात.
विज्ञान काय म्हणतं?- ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे, त्याचा नैसर्गिक आपत्तींशी थेट संबंध नाही.
7- गैरसमज: ग्रहणाचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
विज्ञान काय म्हणतं?- याबद्दलही कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. जर लोकांना या काळात आजारी वाटत असेल तर ते केवळ भीती आणि प्लेसबो इफेक्टमुळे होतं.
प्लेसबो इफेक्टचं उदाहरण द्यायचं झालं तर, एखाद्या व्यक्तीला साखरेची गोळी दिली आणि सांगितलं की ते डोकेदुखीसाठी रामबाण औषध आहे. तरी त्याला ती गोळी खाल्ल्यावर बरं वाटू लागतं. कारण हा औषधाचा परिणाम नसतो तर त्या औषधावरील विश्वासाचा परिणाम असतो. मानवी श्रद्धासुद्धा काहीशी अशीच असते.