Hingana News : आदल्या दिवशी रुजू, दुसऱ्या दिवशी मृत्यू; छतावरून कोसळून कंत्राटी कामगाराचा मृत्यू
esakal September 08, 2025 04:45 AM

हिंगणा - छतावर टिनचे पत्रे ठोकत असताना वीस फूट उंचीवरून खाली पडल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना हिंगणा एमआयडीसीतील झोन चौकातील बीएसके इंडस्ट्रीमध्ये घडली.

कंपनी व्यवस्थापनाने मृतक कामगाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, यासाठी भारतीय जनता कामगार महासंघाने आक्रमक पवित्रा घेत मृतक कामगाराचे शव कंपनीच्या गेट समोर ठेवले. यामुळे काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली.

मृतक कामगार राजेश पटेल (३२) रा. रीवा मध्यप्रदेश येथील असून सध्या बुट्टीबोरी येथे वास्तव्याला आहे. तो हिंगणा एमआयडीसी प्लॉट नंबर एस. ४५ मधील बीएसके इंडस्ट्रीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून ४ सप्टेंबर २०२५ राजेश पटेल रुजू झाला होता.

दरम्यान छप्परचे टीन लावत असताना जवळपास २० फुटावरून खाली जमिनीवर पडल्याने तो गंभीर जखमी झाल्याने त्याला कंपनी व्यवस्थापनाने डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले तिथे त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करण्यात आले.

कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. कामगाराकडे कोणतेही सुरक्षा उपकरण नव्हते. यामुळे या अपघाताला कंपनी व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप कामगार नेत्यांनी केला.

या प्रकरणाची चौकशी करून कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात येईल. मृतक कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी व्यवस्थापनासोबत कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे.

- गोकुल महाजन, ठाणेदार, हिंगणा एमआयडीसी पोलीस स्टेशन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.