लग्न की नोकरी? कंपनीची अजब ऑफर, महिलेने घेतला असा निर्णय की…
Tv9 Marathi September 08, 2025 04:45 AM

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका महिला कर्मचाऱ्याने आपला अनुभव शेअर केला आहे. ती ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीने तिला भावाच्या लग्नाला जा किंवा नोकरीचा राजीमाना दे असे पर्यांय दिले होते. मात्र या महिलेने नात्याला अधिक महत्व दिले आणि भावाच्या लग्नाला जाण्याचा निर्णय घेतला. या महिलेने आपला अनुभव सांगताना नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

महिलेची पोस्ट व्हायरल

एका महिलेने रेडिटवर आपला कंपनीबद्दलचा वाईट अनुभव सांगितला आहे. तिने आपल्या पोस्टला ‘मला कंपनीने भावाचे लग्न किंवा नोकरी असा पर्याय दिला होता, मी नाते निवडले. मी चुकीची आहे का? असे कॅप्शन दिले आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, नमस्कार मित्रांनो, मला तुमचे मत हवे आहे. मी गेल्या 4 वर्षांपासून एका कंपनीत काम करत आहे. मी कंपनीसाठी खूप जास्त मेहनत केली, नवीन लोकांना प्रशिक्षण दिले आणि नेहमीच कंपनीच्या प्रगतीला प्राधान्य दिले. काही दिवसांपूर्वी माझ्या सख्ख्य भावाचे लग्न जमले. हे लग्न अमेरिकेत होते. मी कंपनीला 3 आठवडे आधीच सांगितले होते की मला अमेरिकेला जाण्यासाठी 15 दिवसांची सुट्टी हवी आहे.

महिलेने पुढे लिहिले की, मी सुट्टी मागितल्यावर मला मिळालेले उत्तर अपेक्षित नव्हते. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की लग्नाला जायचे असेल तर राजीनामा द्या. त्यावर मी सुट्टीचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही मला सुटी मिळाली नाही. सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे मी 4 वर्षे मी तडजोड करत कंपनीसाठी काम केले. जेव्हा कंपनी अडचणीत होती तेव्हा मी कमी पगारावरही काम केले. जेव्हा 2 लोक नोकरी सोडून गेले तेव्हा मी त्यांचे कामही अतिरिक्त पगाराशिवाय केले. असे करुणही मला थोडीशीही सहानुभूती दाखवण्यात आली नाही.

कंपनीतील जवळजवळ प्रत्येकजण, अगदी माझा जुना बॉसही कंपनीचा दृष्टिकोन चुकीचा आहे असे म्हणत मला पाठिंबा दिला. माझ्याकडे दुसऱ्या कंपनीची ऑफर नसतानाही मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने माझ्यावर कोणताही मोठा आर्थिक भार नाही. पण माझ्या मनात प्रश्न असा आहे की – मी योग्य काम केले का? नात्याला प्राधान्य देत गरजेच्या वेळी मला साथ न देणाऱ्या कंपनीला सोडण्याचा निर्णय योग्य आहे का?

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

या महिलेची पोस्ट रेडिटवर व्हायरल झाली. नेटकऱ्यांनी कंपनीच्या वृत्तीवर टीका केली. एका युजरने म्हटले की, ‘माझे गुरू नेहमीच म्हणायचे की, प्रथम तुमच्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य द्या, नोकरी त्यानुसार जुळवून घ्यावी. दुसऱ्याने लिहिले की, मी संपूर्ण पोस्ट वाचली नाही, फक्त शीर्षक पुरेसे आहे. तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे. आणखी एकाने म्हटले की, ‘यातून एक मोठा धडा मिळतो, जर तुम्ही एकदा तडजोड केली तर कंपनी नेहमीच फायदा घेण्याचा प्रयत्न करेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.