मुंबई - नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडलांमधील १४ लाख ३६ हजार २३६ हजार हेक्टर जमीन बाधित झाली आहे. १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत.
सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे. १५ ते २० ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने राज्यात मोठे नुकसान झाले आहे.
नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर या जिल्ह्यांतील पिके नष्ट झाली असून मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी पुराने नदीकाठची जमीन खरवडून गेली आहे. बाधित जमिनीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
अतिवृष्टीने बाधित भागातील पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात असून, शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.
- दत्तात्रेय भरणे, कृषिमंत्री