Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो
esakal September 07, 2025 06:45 AM

विशाखापट्टणम,५ सप्टेंबर २०२५: प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या १२ व्या हंगामातील १५ वा सामना यू मुंबा आणि बेंगळुरू बुल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. गेल्या सामन्यात टाय ब्रेकरमध्ये झालेल्या पराभवानंतर या सामन्यात यू मुंबाने दमदार खेळ केला. सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत यू मुंबाने आपली आघाडी कायम ठेवली. यासह यू मुंबाने हा सामना ४८-२८ ने आपल्या नावावर केला. यासह स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली.

विशाखापट्टणमच्या विश्वनाध स्पोर्ट्स क्लबमध्ये पार पडलेल्या सामन्यात यू मुंबाच्या बचावपटूंनी आणि चढाईपटूंनी दमदार कामगिरी केली. यू मुंबाकडून चढाईत अजित चौहानने चढाईत सर्वाधिक १३ गुणांची कमाई केली. त्याला साथ देत सतीषने ६ गुणांची कमाई केली. बेंगळुरू बुल्सकडून चढाईत अलीरेझाने ६ गुणांची कमाई केली. बेंगळुरू बुल्सचा संघ या सामन्यात बचावात आणि चढाईतही पिछाडीवर राहिला. हेच या संघाच्या पराभवाचं कारण ठरलं.

अजित आगरकरसमोर पठ्ठ्याची १९७ धावांची खेळी; रिषभ पंतला 'बदली' खेळाडू म्हणून आला अन् पक्की करू पाहतोय टीम इंडियातील जागा

या सामन्यात यू मुंबाकडून अजित चौहानने पहिल्याच चढाईत बोनस घेऊन संघाला खातं उघडून दिलं. पूर्वार्धातील तिसऱ्या मिनिटाला बेंगळुरू बुल्स संघाला पहिला गुण मिळाला. सुरुवातीच्या ५ मिनिटात यू मुंबाचा संघ ४-३ ने आघाडीवर होता. पूर्वार्धात अजित चौहानने लागोपाठ चढाई करत यू मुंबाच्या गुणसंख्येत भर घातली. त्याला सतीशची चांगली साथ मिळाली.

पूर्वार्धातील ११ व्या मिनिटाला बेंगळुरू बुल्स संघ पहिल्यांदा ऑलआऊट झाला. यासह यू मुंबाने १३-५ गुणांसह ८ गुणांची आघाडी घेतली. पूर्वार्धातील १३ व्या मिनिटाला अजित चौहानने बेंगळुरू बुल्स संघाचा बचाव फोडून काढला. त्याने एकाच चढाईत६ गुणांची सुपर रेड केली. यासह सुपर १० पूर्ण केलं आणि यू मुंबाला २० गुणांवर पोहोचवलं.सामन्यातील सहाव्या मिनिटाला बेंगळुरू बुल्सचा संघ दुसऱ्यांदा ऑलआऊट झाला. यासह २३-७ गुणांसह यू मुंबाने १६ गुणांची आघाडी घेतली. पूर्वार्धातील २० मिनिटांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर यू मुंबाचा संघ २९- १२ गुणांसह १७ गुणांनी आघाडीवर होता.

उत्तरार्धातील तिसऱ्या मिनिटाला बेंगळुरू बुल्सचा संघ तिसऱ्यांदा ऑलआऊट झाला. यासह यू मुंबाची आघाडी ३३-१३ गुणांसह २० गुणांवर जाऊन पोहोचली. पूर्वार्धात पिछाडीवर असलेल्या बेंगळुरू बुल्सने पुजारागमन करण्याचा प्रयत्न केला. पण ते यू मुंबाच्या जवळ पोहोचू शकले नाहीत. अजित चौहान दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतर सतीशने आक्रमणाची जबाबदारी स्वीकारली. उत्तरार्धातील सुरुवातीचे १० मिनिटे पूर्ण झाल्यानंतर यू मुंबाकडे ३९-२० गुणांसह १९ गुणांची भक्कम आघाडी होती.

Asia Cup 2025 : भारत, पाकिस्तानसह सर्व ८ संघ जाहीर; कोणती टीम तगडी, कुठे Live पाहता येणार? सामन्यांच्या वेळेत झाला बदल

उत्तरार्धातील शेवटच्या १० मिनिटात बेंगळुरू बुल्सला १९ गुणांची आघाडी फोडून काढायची होती. पण यू मुंबाची मजबूत पकड आणि चढाईपटूंनी केलेल्या दमदार कामगिरीसमोर बेंगळुरू बुल्सचा निभाव लागू शकला नाही. यू मुंबाने हा सामना ४८-२८ च्या फरकाने जिंकला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.