Satara News: 'वन्यजीवांना घरात आणाल, तर तुरुंगात जाल'; अधिवासातून बाहेर आणून पाळणे गुन्हा; कायद्यात तुरुंगवास, दंडाच्या शिक्षेची तरतूद
esakal September 07, 2025 06:45 PM

कास: जखमी अवस्थेत आढळणारे वन्यजीव औषधोपचार करून घरातच पाळण्याचा मोह अनेकांना होतो. काही जण भूतदया दाखविण्याच्या प्रयत्नात चक्क या जिवांना खायलाही घालतात. वन्यजिवांना खाऊ घालणे किंवा त्यांना त्यांच्या अधिवासातून बाहेर आणून पाळणे, हा वन कायद्याने गुन्हा ठरत आहे.

MLA Subhash Deshmukh: ‘दक्षिण’मधील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत; आमदार सुभाष देशमुख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

यवतेश्वर घाटात माकडांना खायला देणाऱ्यांवर आणि नागाबरोबर फोटो सेशन केल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांनंतर वन्यजीव कायदा आणि त्यांचे संरक्षण हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. वन्यजीव संरक्षण अंतर्गत १९७२ मध्ये कायदा लागू करण्यात आला. यामध्ये वन्यजीव घरात पाळल्याचे सिद्ध झाल्यास तीन ते पाच वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो. शिवाय दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे पक्षी किंवा प्राण्यांना पिंजऱ्यात डांबून ठेवले असेल. त्यांचा उपयोग अंधश्रद्धेसाठी करत असाल तर तो गुन्हा ठरतो.

न शिजवलेले अन्न अपेक्षित

मोर सर्वाहारी पक्षी आहे, त्याच्या आहारात कीटक, साप, फळे, सर्व प्रकारच्या बेरी, बी, कोवळ्या वनस्पती असे वैविध्य असते; पण भूतदया दाखविण्याच्या नादात अनेकदा मोरांना कडधान्य, शिजवलेले अन्न, तांदूळ, गहू, ज्वारी असे अन्न दिले जाते. अनेक ठिकाणी माणसाळलेली वानरे कोल्ड्रिंक्स आणि वेफर्सचा आनंद घेताना दिसतात. वन्यजिवांनी न शिजवलेले अन्न खाणे अपेक्षित आहे. आयते अन्न मिळत असल्याने त्यांच्यातील अन्न शोधण्याची कलाही लुप्त होण्याचा धोका वाढतो. ती मानवी वस्तीकडे आकर्षित होऊन मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढत आहे.

मानवाकडून त्रास नको

प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० मध्ये लागू करण्यात आला. वन्यजिवांची शिकार करणे, तस्करी करणे, त्यांच्या कोणत्याही शारीरिक अवयवाची अवैधरीत्या विक्री करणे, यासाठी कठोर दंडाची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. १८६० मध्ये ४२८ आणि ४२९ हे कलम लागू करण्यात आले आहे. यामध्ये कोणत्याही प्राण्यांना मारणे किंवा जखमी करणे यासंदर्भातील कारवाईचा उल्लेख केला आहे. त्यांना प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, या उद्देशाने १९७८ मध्ये प्राण्यांसाठी वाहतुकीचे नियम लागू करण्यात आले आहेत.

कोणत्याही वन्य किंवा कैदेत असलेल्या प्राण्याला पकडणे, त्याचा पाठलाग करणे, सापळा लावणे, आमिष दाखवणे, कोणत्याही प्राण्याला इजा पोहोचवणे त्याच्या शरीराचा कोणताही भाग नष्ट करणे किंवा घेणे तसेच जर तो प्राणी वन्यपक्षी किंवा सरपटणारा प्राणी असेल तर त्याची अंडी फोडणे अंड्यांना इजा करणे किंवा त्या अंडी किंवा घरटे बिघडवणे आदींबाबत दोषी असेल असे ठरल्यावर सहा महिन्यांपासून ते सात वर्षापर्यंत कारावास तसेच दोन हजार ते ५० लाख रुपयांपर्यंत दंडाचे शिक्षा होऊ शकेल.

- संदीप जोपळे, वनक्षेत्रपाल, सातारा.

काय सांगतो कायदा?

भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार जंगली पक्षी किंवा प्राण्यांना पकडणे, त्यांची वाहतूक करणे किंवा त्यांना पाळणे हा गुन्हा आहे. जंगली पक्षी आणि प्राण्यांना पाळणे, विकणे किंवा त्यांची वाहतूक करणे यांवर बंदी आहे. पोपट, हिल मैनाह यांसारखे स्थानिक जंगली पक्षी तर कासव, ससे आणि इतर जंगली प्राण्यांना घरात पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

Enterprising Teacher: शिक्षकांच्या ज्ञानदान सेवेला ‘सकाळ’मुळे झळाळी; ‘उपक्रमशील शिक्षक’ पुरवणीचे जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्साहात प्रकाशन

कोणत्याही पक्ष्याला पिंजऱ्यात बंद करून ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. रंगबेरंगी छोटे पक्षी बाजारात पिंजऱ्यात विक्रीसाठी दिसतात. त्यांना लव्ह बर्डस् असे म्हणतात. पक्ष्यांची ही जात ऑस्ट्रेलियातून भारतात आलीय. तिकडे हे पक्षी पाळण्यास बंदी असली तरी भारतात परवानगी आहे. मात्र, एकही भारतीय पक्षी पाळण्यास परवानगी नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.