Israel And Huti War : सध्या इस्रायल आणि हुथी बंडखोरांत टोकाचा संघर्ष सुरू आहे. येमेनधील हुथी बंडखोरांनी नुकतेच इस्रायलवर यशस्वी हल्ला केला आहे. या हल्ल्यात हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या विमानतळालाच लक्ष्य केलंय. येमेनच्या ड्रोनच्या मदतीने हे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात इस्रायलमधील रामोन विमानतळाची मोठी नासधूस झाली आहे.
हुथी बंडखोरांनी केलेल्या या हल्ल्यानंतर या विमानतळाच्या कामात अडथळा निर्माण झाला. तसेच एअर ट्रॅफिकही थांबवण्यात आले. या अचानक केलेल्या हल्ल्यामुळे अनेक विमानांचे उशिरा उड्डाण झाले. विशेष म्हणजे हुथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये विमानतळाच्या परिसरात झालेला स्फोट आणि स्फोटानंतर निघालेला धूर स्पष्टपणे दिसत आहे. या हल्ल्याबाबत नंतर इस्रायल सरकारनेही माहिती दिली आहे. या माहितीनुसार येमेनकडून डागण्यात आलेल्या चौथ्या ड्रोनमुळे रामोन विमानतळाचे नुकसान झाले. या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले आहेत, असे इस्रायलने सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलवर येमेनमधून एकूण चार ड्रोन डागण्यात आले होते. यातील तीन ड्रोन हे इस्रायली एअर डिफेन्स सिस्टिमने उद्ध्वस्त करून टाकले. मात्र चौथा ड्रोन रामोन विमानतळावर पडला आणि त्याचा स्फोट झाला. हुथी बंडखोरांनी केलेल्या या हल्ल्यांदरम्यान सायरन वाजले नाहीत. त्यामुळेच इस्रायलमधील लोक बंकरमध्ये लपू शकले नाहीत. येमेनमधून ड्रोन हल्ला होऊनही सायरन का वाजले नाही? याची आता चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, याआधी इस्रायलने गेल्या आठवड्यात येमेनवर हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे आम्ही आता या हल्ल्याचा सूड घेऊ असे हुथी बंडखोरांनी ठरवले होते. तेव्हापासून हुती बंडखोरांकडून इस्रायवर हल्ले करण्यात येत आहेत. हुती बंडखोर इस्रायलशी संबंधित असलेल्या लाल समुद्रातील जहाजांनाही लक्ष्य करत आहेत. आता हा संघर्ष कोणत्या टोकाला जातो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.