इंदोरी, ता. ८ ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ऊस तेथे बांधावर नारळ लागवड व जलतारा या उपक्रमाची इंदोरी ग्रामपंचायत हद्दीत सुरुवात झाली.
विकास ढोरे यांच्या ऊसक्षेत्राच्या बांधावर उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) चारुशीला देशमुख-मोहिते यांच्या हस्ते नारळ लागवडीचा प्रारंभ झाला. यावेळी नायब तहसीलदार अर्चना फडणवीस, नोडल अधिकारी (मावळ) माणिक साबळे व नीलेश देशमुख, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौरभ साबळे, मंडल कृषी अधिकारी आर. पी. गायकवाड, उपकृषी अधिकारी नवीनचंद्र बोराडे, सहाय्यक कृषी अधिकारी कल्पना घोडे तसेच सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच बेबीताई बैकर व सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमाचा लाभ पाच एकरपर्यंत क्षेत्र असणारे शेतकरी घेऊ शकतात. हेक्टरी वीस नारळाची झाडे ऊस शेतीच्या बांधावर लावली जातात. तीन वर्षांनंतर त्या शेतकऱ्यास अनुदान मिळते. इंदोरी हद्दीत किमान १०० शेतकरी उपक्रम राबवतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. ग्रामपंचायत अधिकारी अरुण हुलगे यांनी प्रास्ताविक केले. नियोजन दाऊद तांबोळी, विजय हिंगे, अनिकेत सोनवणे व भरत भिसे यांनी केले. आभार सरपंच शिंदे यांनी मानले.
---