विरार, ता. ८ (बातमीदार) : शिक्षक दिन म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या उत्तम गुणांचा व त्यांच्या प्रेरणेचा दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान देवून त्यांना माणूस म्हणून घडविले, म्हणूनच देशाच्या विकासात शिक्षकांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन प्रा. मनिष घायाळ यांनी चद्रपाडा येथील शांती गोविंद हायस्कूलमध्ये शिक्षकदिन कार्यक्रमात केले.
शिक्षकांनी दिलेले ज्ञान फार महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी त्याचे मनन, चिंतन करून आपल्या जीवनात बदल घडवून आणला पाहिजे. तसेच त्यांनी सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत. शिक्षक हे माणूस घडविणारे महान संत आहेत. निसर्ग हादेखील आपला गुरू असून, निसर्गामुळे आपल्याला नेहमी नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. पुस्तक वाचल्याने आपला आत्मविश्वास वाढतो, म्हणून पुस्तक हेच माझे गुरू असल्याचे सांगून स्वःरचित कवितांतून प्रा. घायाळ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे अध्यक्ष भरत म्हात्रे, मुख्याध्यापक ॲड. जयेश म्हात्रे, उपमुख्याध्यापक शांता भूसाणे व इतर शिक्षक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांसह शिक्षकांचा गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या जीवनावर पथनाट्य सादरीकरण करण्यात केले.