चंद्रगुप्त मौर्यांचा उल्लेख संस्कृत, पाली, प्राकृतसह अगदी ग्रीक आणि लॅटिन भाषांमधील अनेक ग्रंथांतही आढळतो. त्यावरूनच त्यांचा प्रभाव किती जास्त होता, याचा अंदाज येतो.
या साहित्य रचनांमध्ये मेगस्थनिजच्या 'इंडिका'चाही समावेश आहे. परंतु, मौर्य राजवंशाची पायाभरणी करणाऱ्या या सम्राटाच्या कारकिर्दीचं प्रामाणिक वर्णन असणारी कोणतीही मूळ प्रत उपलब्धच नाही.
अगदी चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू अशोकनंही शिलालेखांमध्ये आजोबांचा उल्लेख केलेला नाही.
चंद्रगुप्त मौर्यांबद्दल इतिहासकारांमध्ये एकमत नाही. 'दिघ निकाय' आणि 'दिव्यावदान' सारख्या बौद्ध स्त्रोतांमध्ये मौर्यांचा उल्लेख पिप्पलिवनवर राज्य करणाऱ्या क्षत्रियांचे वंशज असा केला आहे.
दुसरीकडं, अनेक अभ्यासकांना असा विश्वास आहे की, मौर्य या शब्दाचं मूळ मयूरमध्ये आहे. त्यामुळं ते खूप जास्त मोर असणाऱ्या ठिकाणचे रहिवासी असावेत किंवा त्यांच्या जीवनात मोरांना खूप महत्त्वं असेल, असं मानलं जातं.
काही लोकांच्या मते ते मोर पाळत होते, तर काहींना ते मोरांची शिकार करायचे असंही वाटतं. पण निश्चितपणे काहीही सांगणं कठीण आहे.
विशाखदत्तने त्यांचं प्रसिद्ध नाटक 'मुद्राराक्षस'मध्ये चंद्रगुप्तांसाठी 'वृषला' शब्द वापरला आहे. काही लोक त्याचा अर्थ 'शूद्राचा पुत्र' असा सांगतात.
पण राधाकुमुद मुखर्जी यांनी 'चंद्रगुप्त मौर्य अँड हिज टाइम्स' या पुस्तकात लिहिलं आहे की, 'वृषला' हा एक आदरार्थी शब्द आहे.
त्याचा अर्थ 'सर्वोत्तम राजा' असा होतो. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये चाणक्य चंद्रगुप्तांना प्रेमानं 'वृषला' असं संबोधतात.
चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांची भेटचंद्रगुप्त मौर्य यांच्या जन्माबाबत अनेक मतभेद आहेत. पण ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात त्यांनी सुमारे 21 वर्षे राज्य केलं यात शंका नाही.
सुरुवातीला त्यांनी पंजाबमध्ये जम बसवला आणि नंतर पूर्वेकडे जात मगधचा ताबा घेतला. या संपूर्ण मोहिमेत चाणक्यांनी चंद्रगुप्त यांना सर्वाधिक मदत केली. चंद्रगुप्त आणि चाणक्य यांची भेट झाल्याची एक मनोरंजक कथाही आहे.
अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये मगधचे राजा धनानंद यांच्या वाईट वर्तनाने दुखावलेले चाणक्य ग्रामीण भागात फिरत असल्याचा उल्लेख आढळतो. त्यावेळी 11-12 वर्षांचे असलेले चंद्रगुप्त मुलांबरोबर खेळत होते. त्यांनी एक दरबार तयार केला होता आणि ते मुलांचे राजे बनले होते.
देविका रंगाचारी यांच्या 'द मौर्य, चंद्रगुप्त टू अशोक' या पुस्तकानुसार, "चाणक्यांनी चंद्रगुप्ताला झाडाच्या खोडावर बसून पुराव्याच्या आधारे न्याय देताना पाहिलं. त्यानं ते खूप प्रभावित झाले. त्यांनी मुलांच्या पालकांना त्याला सोबत नेऊ देण्याची विनंती केली."
"चाणक्य चंद्रगुप्तांना तक्षशिला इथं घेऊन गेले. सध्या हे ठिकाण पाकिस्तानात आहे. तिथं त्याला गुरुकुलात प्रवेश दिला. तेव्हा तक्षशिला हे शिक्षणाचं सर्वात मोठं केंद्र होतं. चाणक्यांनी इथं अनेक प्रकारची परीक्षा घेत चंद्रगुप्तांची भविष्यातील आव्हानांसाठी तयारी करून घेतली."
याच काळात अलेक्झांडरनं भारतात मोहीम सुरू केली होती. तेव्हा संधीचं सोनं करण्यात तज्ज्ञ असलेल्या चाणक्यांनी चंद्रगुप्त यांना अलेक्झांडरच्या भेटीला पाठवलं.
ग्रीक इतिहासकार प्लुटार्क यांच्या मते, "चंद्रगुप्त मगधवर हल्ला करण्यासाठी अलेक्झांडरची मदत मागण्यासाठी गेल्याचे संकेत कुठंही आढळत नाहीत. ही बैठकही अपयशी ठरली. चंद्रगुप्त अलेक्झांडरसमोर असं काही बोलले जे त्याला आवडलं नाही."
आणखी एक ग्रीक इतिहासकार जस्टीन लिहितात की, "चंद्रगुप्त यांच्या बोलण्याच्या शैलीनं अलेक्झांडरला एवढा राग आला होता की, त्यानं त्यांना ठार मारण्याचा आदेश दिला होता. पण पायांच्या वेगामुळं ते बचावले."
"तिथून पळाल्यानंतर चंद्रगुप्त थकून झोपले होते, तेव्हा एक सिंह त्यांच्याजवळ आला आणि त्याच्या शरीरातून वाहणारा घाम चाटून तिथून निघून गेला. त्यानंतर चंद्रगुप्त यांनी काही लोक जमवले आणि स्वतःचं सैन्य तयार करायला सुरुवात केली."
जस्टीनच्या वर्णनावरून असं दिसून येतं की, चंद्रगुप्तांनी अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर पंजाब आणि सिंधमधील लोकांना मुक्त केले.
चंद्रगुप्तांचं चाणक्यांवरील अवलंबित्वचंद्रगुप्तांचं पुढचं लक्ष्य होतं मगध. तिथं चंद्रगुप्तांच्या लहान सैन्याचा सामना तुलनेनं खूप मोठं सैन्य असलेल्या धनानंदच्या सैन्याशी झाला. त्यात चंद्रगुप्त विजयी झाले.
बौद्ध ग्रंथ 'मिलिंद पन्हो'मध्ये या युद्धाचं वर्णन आढळतं. त्यानुसार, "भद्दसालाच्या नेतृत्वात नंदच्या सैनिकांनी चंद्रगुप्तांविरुद्ध शौर्याने लढा दिला. या युद्धात धनानंद वगळता नंद राजवंशातील सर्व भाऊ मारले गेले."
या संपूर्ण मोहिमेत चाणक्य सावलीसारखे चंद्रगुप्तांबरोबर होते.
देविका रंगाचारी लिहितात की, "या संपूर्ण गोष्टीमध्ये चाणक्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. अनेक ठिकाणी चंद्रगुप्त यांच्याकडं मूक प्रेक्षक म्हणून पाहिलं जाते. जे चाणक्यासोबत चालतात आणि त्यांनी आखलेल्या योजना राबवून मगधचा राजा बनतात."
"पण, एखाद्या अनोळखी व्यक्तीवर इतका विश्वास ठेवून आपलं संपूर्ण भवितव्य त्यांच्या हाती सोपवणं सोपं नव्हतं हेही लक्षात घ्यायला हवं. पण चंद्रगुप्त हे सर्व करत असताना खूप लहान होते."
चाणक्य आणि धनानंद यांच्यातील संघर्षधनानंदला गादीवरून हटवण्यासाठी चाणक्य यांनी चंद्रगुप्तांची मदत घेतली होती. पण असं करण्यामागे नेमकं असं काय शत्रूत्व होतं? हाही प्रश्न उपस्थित होतो.
एका वर्णनानुसार, चाणक्य एकदा पाटलीपुत्रमधील धनानंदच्या दरबारात जेवत होते. त्यानंतर धनानंद दरबारात आले आणि त्यांची पहिली नजर चाणक्यावर पडली.
दीपा अग्रवाल त्यांच्या 'चाणक्य - द मास्टर ऑफ स्टेटक्राफ्ट' या पुस्तकात लिहितात की, "राजाला पाहूनही चाणक्य जेवत राहिले. त्याचा अहंकारी राजाला राग आला आणि त्यांनी चाणक्यांना जेवण थांबवून लगेचच दरबारातून निघून जाण्याचा आदेश दिला."
"चाणक्यांनी त्यांचं ऐकलं नाही, तर राजाचा राग आणखी शिगेला पोहोचला. त्यानंतर चाणक्य रागाने उठले आणि 'नंद राजवंशाची मुळे उखडून टाकेपर्यंत केसांची गाठ बांधणार नाही', अशी प्रतिज्ञा केली. त्यानंतर ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मदत करू शकेल अशा व्यक्तीच्या शोधात ते फिरू लागले."
चंद्रगुप्त मौर्य आणि दुर्धारा यांचा विवाहपराभवानंतर धनानंदला राज्य सोडावं लागलं आणि त्यानंतर चाणक्य पुन्हा केसांची गाठ बांधू लागले.
देविका रंगाचारी लिहितात की, "चाणक्यांनी चंद्रगुप्त आणि या निर्वासित राजाची सर्वात धाकटी कन्या दुर्धारा यांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला."
"ज्या मुलीच्या वडिलांना गादीवरून पायऊतार करण्यात आलं, त्याची मुलगी असं करणाऱ्याशी विवाहाचा विचार कसा करणार हे जरा विचित्र होतं.
पण हा प्रस्ताव राजकीय विचार करून दिलेला होता. कारण यापूर्वीही दोन राजांमधील वैर संपवण्यासाठी अशा प्रकारे विवाह संबंध जोडण्याचे प्रयत्न करण्यात आलेले होते," असंही रंगचारी लिहितात.
पाटलीपुत्रचे वैभवइसवी सन पूर्व 320 पर्यंत चंद्रगुप्तांनी भारतातील सर्व प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत गंगेच्या संपूर्ण मैदानावर राज्य स्थापन केलं. त्यावेळी मगधची राजधानी पाटलीपुत्र जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होती.
डायटर शिलिंगलोफ त्यांच्या 'फोर्टिफाइड सिटीज ऑफ इंडिया' पुस्तकात लिहितात की, "पाटलीपुत्रचं एकूण क्षेत्रफळ 33.8 किलोमीटर होतं. इजिप्तमधील अलेक्झांड्रिया शहराचं क्षेत्रफळही त्याच्या निम्मं होतं. तर रोमचं क्षेत्रफळ फक्त 13.72 चौरस किलोमीटर होतं. पाटलीपुत्र अथेन्सपेक्षा अकरा पट मोठं शहर होतं. संपूर्ण शहरात 64 दरवाजे आणि 570 बुरुज होते. त्यावेळी पाटलीपुत्रमध्ये सुमारे पाच लाख लोक राहायचे."
अलेक्झांडरचा उत्तराधिकारी सेल्युकस साम्राज्य परत मिळवण्यासाठी पूर्वेकडं गेला तेव्हा त्याचा प्रयत्न उलटला. इसवी सन पूर्व 305 मध्ये, त्याचा चंद्रगुप्त मौर्यांशी सामना झाला आणि त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला.
इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल यांच्या 'द गोल्डन रोड' या पुस्तकानुसार, "चंद्रगुप्तांनी त्यांच्या 9000 हत्तींपैकी 500 हत्ती सेल्युकसला देऊन हा भाग मिळवला होता. सेल्युकसनं राज्याचा पूर्वेकडचा भाग चंद्रगुप्तांना दिला. तसंच चंद्रगुप्तानं त्यांच्या एका मुलाचा सेल्युकसच्या मुलीशी लग्न लावल्यानंतर त्यांच्यातील मैत्री आणखी घट्ट झाली होती."
पॅट्रिक ऑलिव्हेल 'सोसायटी इन इंडिया 300 बीसी टू 400 बीसी'मध्ये लिहितात की, "त्या काळात शांतता करारांसाठी असं करण्याची प्रथा होती म्हणून चंद्रगुप्तांनी स्वतः ग्रीक महिलेशी लग्न केलं असावं. चंद्रगुप्तांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या धमण्यांत आजही ग्रीक रक्त वाहत असेल, हे शक्य आहे."
चंद्रगुप्त मौर्यांची शासनव्यवस्थासेल्युकसने एक प्रतिनिधी मेगस्थनिज याला चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारात पाठवलं होतं. त्यानं त्याच्या 'इंडिका' या पुस्तकात तेव्हाच्या भारताबाबत सविस्तर वर्णन केलं आहे.
दुर्दैवानं, मेगस्थनिजनच्या वर्णनाची मूळ प्रत सध्या उपलब्ध नाही. पण त्याचा वापर करून अनेक ग्रीक आणि लॅटिन लेखकांनी तेव्हाच्या भारताचं चित्र मांडलं आहे.
या वर्णनावरून दिसून येतं की मौर्य साम्राज्याचं प्रशासन अत्यंत प्रगतीशील होतं. तसंच राज्याच्या आर्थिक घडामोडींवर त्यांचं संपूर्ण नियंत्रण होतं.
राजा हा प्रशासनाचा प्रमुख होता. तर त्यांच्या मदतीसाठी 18 'अमात्य' होते. ते प्रशासनाच्या प्रत्येक विभागावर लक्ष ठेवून असायचे.
चंद्रगुप्त मौर्यांचं प्रचंड लष्करचंद्रगुप्तांच्या न्यायव्यवस्थेचं कौतुक करताना मेगस्थनिजनं लिहिलं होतं की, राजा स्वतः खुल्या न्यायालयात लोकांना न्याय द्यायचा.
ए.एल. बाशम त्यांच्या 'द वंडर दॅट वॉज इंडिया' पुस्तकात मेगस्थनिजच्या दाखल्यानं लिहितात की, "चंद्रगुप्त पाटलीपुत्रमधील एका आलिशान आणि विशाल राजवाड्यात राहायचे. त्याचं सौंदर्य आणि भव्यता अविश्वसनीय होती. पण त्यांचं जीवन फारसं आनंदी नव्हतं. कारण त्यांना कायम त्यांच्या हत्येची भीती वाटायची."
"त्यांच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था केलेली होती. पाटलीपुत्रला सर्व बाजूंनी लाकडी भिंतीचं कडं होतं. त्या भिंतींमध्ये विविध ठिकाणी छिद्रं होती. म्हणजे तिथून बाणांनी हल्ला करता यायचा."
शत्रूचं सैन्य शहरात प्रवेश करू नये म्हणून भिंतीला लागून 600 फूट रुंदीचा खड्डा खोदलेला होता. पाटलीपुत्रचा कारभार तीस सदस्यांचं एक प्रशासकीय मंडळ चालवत होतं.
चंद्रगुप्तांचं एक मोठं लष्कर होतं. त्या लष्कराला नियमितपणे पगार आणि शस्त्रं दिली जायची.
मेगस्थनिजच्या मते, चंद्रगुप्तांच्या सैन्यात सहा लाख पायदळ, तीस हजार घोडदळ आणि नऊ हजार हत्ती होते. माहुतांशिवाय प्रत्येक हत्तीवर चार सैनिक स्वार असायचे.
चंद्रगुप्तांचा दिनक्रमचंद्रगुप्त मौर्य त्यांचा बहुतांश वेळ राजवाड्यात घालवायचे.
जेडब्ल्यू मॅकक्रिन्डल त्यांच्या 'अँशियंट इंडिया अॅज डिस्क्रिप्टेड बाय मेगस्थनिज अँड एरियन' पुस्तकात लिहितात की, "चंद्रगुप्तांच्या सुरक्षेची जबाबदारी सशस्त्र महिला अंगरक्षकांवर होती. ते लोकांमध्ये यायचे तेव्हा जांभळी आणि सोन्याचं भरतकाम केलेली उत्कृष्ट मलमलचं वस्त्रं परिधान करायचे. कमी अंतर असेल तर घोड्यावरून आणि लांब अंतरासाठी ते हत्तीवर बसून प्रवास करायचे."
"ते दिवसा झोपत नव्हते. रात्रीच्या वेळी झोपताना ते बेडरूम बदलायचे. कोणी मारण्याचा कट केला तर तो उधळला जावा म्हणून ही खबरदारी होती. मालिश करून घेत असतानाही ते लोकांच्या समस्या ऐकायचे. हत्ती, बैल आणि गेंड्यांची आपसांतील लढाई पाहण्याची त्यांना आवड होती. बैलांची शर्यत पाहण्याची संधी ते कधीही सोडत नव्हते."
सिंहासनाचा त्यागआयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात, चंद्रगुप्त मौर्य शांतीच्या शोधात जैन धर्माकडं वळले. त्यांनी सिंहासनाचा त्याग केला आणि मुलगा बिंदुसार याला मगधचा सम्राट बनवलं.
रोमिला थापर त्यांच्या 'अर्ली इंडिया' पुस्तकात लिहितात की, "चंद्रगुप्त मौर्य एका जैन भिक्षू भद्रबाहूसोबत दक्षिणेला गेले. तिथे त्यांनी कर्नाटकातील श्रवण बेळगोला येथे जैन पद्धतीने उपवास करत जीवन संपवलं. इ.स.पूर्व 293 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त होतं."
एका अर्थानं ते संपूर्ण भारतीय उपखंडाचे राजे होते. त्यांचं साम्राज्य इराणच्या सीमेपासून गंगेच्या संपूर्ण खोऱ्यापर्यंत पसरलेलं होतं.
त्यात आजचा हिमाचल प्रदेश आणि काश्मीरचाही समावेश होतो. कलिंग (ओडिशा), आंध्र आणि तमिळनाडू हे त्यांच्या साम्राज्यात समाविष्ट नव्हते. पण आजचा अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान त्यांच्या साम्राज्याचा भाग मानले जातात.
चंद्रगुप्त मौर्य हे केवळ एक महान राज्यकर्ता आणि योद्धा नव्हते तर तेवढेच महान प्रशासक आणि व्यवस्थापकही होते, असंही म्हटलं जातं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.