भारताचा अजून एक शेजारी अस्थिरतेच्या गर्तेत अडकला आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशानंतर आता नेपाळचा क्रमांक लागला आहे. येथे दोन दिवसांपासून अराजकता माजली आहे. विद्यार्थ्यांच्या आडून सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रपतींचे खासगी निवास स्थान आणि मंत्र्यांच्या घरात तोडफोड केली आणि आग लावण्याचा प्रयत्न केला. या आघाडी सरकारमधून अनेक मंत्री राजीनामा देऊन पळ काढत आहेत. आतापर्यंत नऊ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. गृह,आरोग्य, कृषी आणि परराष्ट्रमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तर नेपाळी काँग्रेसच्या सर्वच मंत्र्यांनी पदावर पाणी सोडले आहे. उप पंतप्रधान प्रकाश मान सिंह यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे.
पंतप्रधान देश सोडणार ?
हाती येत असलेल्या ताज्या वृत्तानुसार, राष्ट्रपतींचे घर अगोदर टार्गेट करण्यात आले. त्यानंतर लागलीच पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. सध्याची राजकीय परिस्थितीही हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. सोशल मीडिया आणि महागाई यांच्या आडून ओली सरकार उलथवण्याचा डाव असल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिका की चीन या मागे कोण आहे याकडे तज्ज्ञांचे लक्ष लागले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे दक्षिण आशियात भारताशेजारी अजून एक वणवा पेटला आहे. ओली हे लवकरच देश सोडून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काठमांडू्त तरुणाईचा महापूर
नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अत्यंत उग्र आंदोलन सुरू आहे. काठमांडूमध्ये तरुणाईचा महापूर आला आहे. प्रदर्शन करणारे कोणत्याही परिस्थितीत मागे हटायला तयार नाहीत. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या खासगी घरावर ताबा मिळवला आहे. तर सोमवारी गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला. त्या पाठोपाठ परराष्ट्र मंत्री डॉ. आरजू राणा देऊबा, प्रसारण खात्याचे कारभारी पृथ्वी सुब्बा गुरुंग, ऊर्जामंत्री दीपक खडका यांच्या घरावर आंदोलकांनी हल्लाबोल चढवला. त्यांच्या घराची तोडफोड केली. त्यांनतर तरुणांनी संसदेकडे मोर्चा वळवला. सध्या संसदेच्या काही दरवाज्यांवर सैनिकांचा पहारा आहे.
उपपंतप्रधान प्रकाश मान सिंह यांच्यासह 9 मंत्र्यांनी पदाला रामराम ठोकला आहे. गृहमंत्री रमेश लेखक यांनी अगोदर राजीनामा दिला. त्यानंतर कृषी मंत्री रामनाथ अधिकारी, आरोग्य मंत्री प्रदीप पौडेल यांच्यासह काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी राजीनामा दिला. मंत्री प्रदीप यादव यांनी त्यांचा राजीनामा सोपवला. तरुणाईच्या रोषानंतर सरकारने तातडीनं सर्व सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली. तरीही आंदोलक रस्त्यावरून हटायला तयार नाहीत. पंतप्रधान ओली हे नुकतेच चीन दौऱ्यावरून परत आले आणि हा वाद झाला. यामागे चीन अथवा अमेरिका यापैकी एका देशाचा हात असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. या आंदोलनामुळे नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा बहाल होते का, याकडे आंतरराष्ट्रीय अभ्यासकाचं लक्ष लागलं आहे.