सातारा: संगममाहुली (ता. सातारा) येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या ट्रक व दुचाकी अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे. वसंतराव आनंदराव माने (वय ६५, रा. भोसे, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव आहे. त्यांनी भारतीय सेना दलात दोन पॅरा युनिटमध्ये सेवा बजावली होती. ते सुभेदार म्हणून सेना दलातून निवृत्त झाले होते.
दोन पॅरा युनिटचा स्थापना दिवस आज असल्याने वसंतराव माने हे सकाळी भोसे येथून येथे आयोजित केलेल्या माजी सैनिकांच्या कार्यक्रमासाठी साताऱ्यात आले होते. सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडलेल्या वसंतराव माने शहरातील इतर कामे उरकली आणि ते कार्यक्रमासाठी गेले. कार्यक्रम संपल्यानंतर दुचाकीवरून गावी जात असताना संगममाहुली येथील वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा सध्या राजस्थान सीमेवर सेनादलात कार्यरत आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व सुना, नातवंडे असा परिवार आहे. अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. हवालदार कराळे तपास करत आहेत.