इंदोरी, ता. ८ ः ‘‘महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. त्यांच्या वास्तव्याने ती स्थळे तीर्थक्षेत्र बनली आहेत. मात्र, त्यांच्या विचारांशी खऱ्या अर्थाने जोडायचे असेल, तर संत साहित्य केवळ वाचून उपयोग नाही, ते जीवनात उतरवणे गरजेचे आहे,’’ असे स्पष्ट मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
खडकी येथील टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने भंडारा डोंगरावर वाड्.मय मंडळाची स्थापना डॉ. मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संत साहित्याच्या जीवनदृष्टीवर सखोल भाष्य केले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संचालक रमेश अवस्थे व काशिनाथ देवधर, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्रा. अविनाश कोल्हे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘‘आपण अनेकदा संतांचे अभंग, ओव्या, गाथा फक्त पाठ करतो. पण त्यांच्या आचारधर्मातून जी माणुसकी, समतेची शिकवण मिळते ती आपल्याला कृतीत उतरवता आली पाहिजे. हेच खरे संत साहित्याचे सार आहे.’’ प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले, ‘‘भंडारा डोंगर हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगरचनांचे पवित्र स्थळ आहे. येथे येऊन विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन सृजनशीलतेकडे वळावे.’’ प्रास्ताविक प्रा. महादेव रोकडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शैलेश काळे यांनी केले. नियोजन डॉ. कविता चव्हाण व प्रा. सारिका मुंदडा यांनी केले. आभार स्वामीराज भिसे यांनी मानले.