छत्रपती संभाजीनगर : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याच्या घरावर अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने छापा टाकून १२ ग्रॅम एमडी ड्रग्ज, गावठी कट्टा, जादूटोण्याचे साहित्य आणि रसायनाचा मोठा साठा असा सुमारे ९० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शहरातील कटकटगेट परिसरातील मुजीब कॉलनीत रविवारी (ता. ७) दुपारी ही कारवाई करण्यात आली. शेख नियाज शेख नजीर (३५) या संशयितास अटक करण्यात आली आहे.
नियाज शेख घरात अमली पदार्थांचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक गीता बागवडे यांना मिळाली. त्यानुसर बागवडे यांनी पथकासह दुपारी पावणेचारच्या सुमारास नियाज शेखच्या घरावर छापा टाकला.
घराच्या बेडखालील पिशवीतून दोन वेगवेगळ्या पाकिटांत १२.०७ ग्रॅम एमडीसदृश पांढरी पावडर आढळली. याप्रकरणी संशयित नियाज शेख याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, संदीपान धर्मे, सतीश जाधव, महेश उगले, नीतेश सुंदर्डे, विजय त्रिभुवन, छाया लांडगे, काळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
काळ्या जादूचे साहित्यसंशयिताच्या घरातील दुसऱ्या खोलीत गावठी कट्टा, रिकामी मॅगझीन, प्राण्यांची हाडे, कासवाचे कवच, कवटीच्या माळा, मुखवटा, चामडी चाबूक, रसायनांच्या बाटल्या, नाणी, इंजेक्शन सिरींज व इतर साहित्य मिळाले. काळ्या जादूसाठी वापरले जाणारे हे साहित्य असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
असा मुद्देमाल जप्त७२ हजार रुपये किमतीची एमडीसदृश पावडर
१८.७६ ग्रॅम रसायन
गावठी कट्टा, रिकामी मॅगझीन
प्राण्यांची हाडे, कवटीच्या माळा, मुखवटे
रसायनांच्या बाटल्या, वजन काटे, जुनी ५०० ची नोट