swt81.jpg
90149
सावंतवाडीः शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानमार्फत बुजविण्यात आले.
सावंतवाडी शहरातील खड्डे श्रमदानातून बुजवले
सामाजिक बांधिलकीचा पुढाकार ः पालिकेकडून प्रतिसाद न मिळाल्याने नाराजी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः शहरातील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते मिळावेत यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. पालिकेसमोरच्या रस्त्यावरील तब्बल ३५ खड्डे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून बुजवले. यामुळे बाजारपेठ आणि आरपीडी हायस्कूल रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रतिष्ठानने पालिकेला या खड्ड्यांबाबत आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. ''जर हे खड्डे बुजवले नाहीत, तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरू'', असा इशारा प्रतिष्ठानने दिला होता. मात्र, पालिकेकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, तसेच गणेशोत्सवाची सुट्टी संपून शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने वाढत्या वाहतुकीचा विचार करून प्रतिष्ठानने पुन्हा एकदा रात्रीचा दिवस करत हे काम पूर्ण केले. या कामासाठी भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक बबन डिसोजा यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांनी खडी आणि वाळू पुरवून मदत केली, तर प्रतिष्ठानचे रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनी सिमेंट व मजुरीचा खर्च उचलला. श्री. डिसोजा यांचे योगदान केवळ खड्डे बुजवण्यापुरते मर्यादित नाही; त्यांनी पावसाळ्यापूर्वी भटवाडीतील धोकादायक झाडेही स्वतःच्या खर्चाने तोडून घेतली होती. या उपक्रमात श्री. डिसोजा, राज्य माहिती आयोग अधिकारी सुशील चौगुले, बांधकाम व्यावसायिक दादा नग्नूर आणि त्यांचे कामगार समीर यांचे सहकार्य लाभले. श्री. जाधव आणि लक्ष्मण कदम यांच्या नेतृत्वाखालील या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.