हवामान परिषदेमध्ये पर्यावरणाविषयी चर्चा
esakal September 09, 2025 02:45 PM

विरार, ता. ८ (बातमीदार) : वसईमधील निकृष्ट रस्ते, अनियोजित बांधकाम व भरावामुळे येणारे पूर, मूलभूत सेवांचा अभाव, महिला सुरक्षा, अपुरी सार्वजनिक परिवहन व्यवस्था, सार्वजनिक शौचालयांचा अभाव, कमी दर्जाच्या व पगाराच्या नोकऱ्या, अनियंत्रित बांधकामांमुळे तलाव, भूजल, नष्ट होणारी तिवराची जंगले व पाणथळ जागा याबाबत वसई-विरार हवामान परिषदेमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. निर्मळ येथील समाज सेवा मंडळ हॉल येथे हवामान बदल व त्यामध्ये स्थानिकांची, शहरातील जनतेचा सहभाग यांना घेऊन दोनदिवसीय परिषद पार पडली.

वसई व परिसरातील १५० हून अधिक संस्था, संघटना, अभ्यासक आणि शहर प्रतिनिधींना हवामान वास्तव आणि न्याय्य हवामान कृतीच्या संवादासाठी या परिषदेच्या निमित्ताने एकत्र आणले. जागतिक ‘टाउन हॉल सीओपी’पासून प्रेरित होऊन, परिषदेने वसई-विरारमधील पर्यावरणाचे प्रश्नांना लोकल ते ग्लोबल जोड देण्याबाबत चर्चा व कृती आराखड्यावर भर दिला.

वसई-विरारमधील पर्यावरण संघर्षाचा इतिहास मांडताना मॅकेन्झी डाबरे यांनी, ग्रामीण भागातील हरित वसईची लढाई ते आता पुरात बुडणारी वसई हे वास्तव मांडले. नागरिकांनी पर्यावरण बदल लक्षात घेत आपल्या अस्तित्वाच्या दृष्टीने एकत्र येऊन अभ्यास वर्ग, पर्यायी नियोजन व जमिनीवरील लढाई यांची सांगड आवश्यक असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य हवामान बदल कृती आराखड्यामध्ये (२०२० ते ३०) मुंबई आणि वसईसारख्या उपनगरीय भागांना हवामान बदलाचा सर्वात जास्त धोका कसा आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला.

वसई-विरारमधील हवामान बदलामुळे दैनंदिन संघर्ष कसा वाढतो, याचे अनुभव विविध सामाजिक कार्यकर्ते व तज्ज्ञांनी व्यक्त केले. हवामान कृती कक्षाच्या श्रुती पांचाळ, वास्तुविशारद अनिरुद्ध पॉल, सामाजिक कार्यकर्ते समीर वर्तक, युवाच्या कार्यकारी संचालक रोशनी नुग्गेहल्ली यांनी मांडणी केली.

हवेच्या गुणवत्तेमध्ये बिघाड
अभ्यासक दानिया डाबरे यांनी वसई-विरारमधील अलीकडील अभ्यासातील प्रमुख निष्कर्ष सादर केले. वसईमधील जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या उच्चांकासह अतिउष्णतेचे असल्याचे नमूद केले. तुंगारेश्वर राखीव वनाच्या काही भागात भूस्खलनाची उच्च संवेदनशीलता नोंदवली गेली. वसई-विरारमधील सततचे वायू प्रदूषण अधोरेखित करताना बेसुमार बांधकामे, उघडे आरएमसी प्लांट आणि वाढती धूळ यामुळे हवेची गुणवत्ता बिघडत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.