राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आल्याचा जीआर काढण्यात आला आहे. या जीआरमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा नेत्यांविरोधात ओबीसी नेते असं चित्र सध्या महाराष्ट्रात पहायला मिळत आहेत. हैदराबाद गॅझेटवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल सुरूच आहे. यावरून आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी हाके यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हा सरकारचा शब्द आहे, हाकेंनी विनाकारण मराठा समाजावर टीका करण्याची आवश्यकता नाही. हाकेंनी मुक्ताफळे उधळायची बंद करावीत. समाजाचे पुढारपण करायला बंदी नाही, मात्र दुसऱ्या समाजावर टीका करण्याचा अधिकार नाही, असं यावेळी विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकारणात असे जे नवीन पुढारी आहेत त्यांचे समाजासाठी काहीही योगदान नाही. प्रसिद्धीच्या झोतात येऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजाने विरोध केल्याचे एकही उदाहरण नाही. मराठा समाज जेव्हा स्वतःच्या हक्कासाठी भांडतोय, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण मिळत आहे, त्यामुळे यात आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. अपघाताने पुढारी झालेले लोक अशा पद्धतीने राजकारण करतात, त्यांच्याबाबत काय बोलावे हा प्रश्न आहे, असा खोचक टेला यावेळी विखे पाटील यांनी हाके यांना लगावला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील टीका केली आहे. काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं आश्चर्य वाटतं. स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवत होते, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण कोर्टात तुम्ही घालवलं. हे तुमचं पाप आहे. आरक्षणाबद्दल तुम्हाला काहीही सोईर सुतक नव्हतं. मराठा आरक्षण मिळू शकत नाही असे तुमचे जाणते राजे सांगायचे. काही लोक राजकीय सदम्यातून अजून सावरलेले नाहीत. त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. या पराभूत झालेल्या लोकांना काही आरक्षण देता येईल का? असा विचार करतोय. असा खोचक टोला यावेळी विखे पाटील यांनी थोरात यांना लगावला आहे.