नेपाळमध्ये परिस्थिती बिघडत चालली आहे. प्रत्येक तासागणिक नेपाळची हालत खराब होत आहे. विरोध प्रदर्शनाने हिंसक रुप धारण केलय. राजधानी काठमांडूसह अनेक भागात जाळपोळ, तोडफोड, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या खासगी घरात आंदोलकांनी घुसून तोडफोड केली, आग लावली. याआधी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या पार्टीचे नेते रघुवीर महासेठ आणि माओवादी अध्यक्ष प्रचंड यांच्या घरावर हल्ला झाला. गृहमंत्री रमेश लेखक, कृषि मंत्री रामनाथ अधिकारी,आरोग्य मंत्र्यांसह पाच मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर उपचाराच्या नावाखाली पीएम ओली दुबईला निघून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी उपपंतप्रधानांना कार्यवाहक जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतलाय.
या हिंसक विरोध प्रदर्शनादरम्यान केपी ओली यांनी संध्याकाळी 6 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कर्फ्यू आणि सुरक्षेची मजबूत व्यवस्था असूनही हिंसाचार वाढत चालला आहे. राजकीय संकट अधिक गंभीर बनत आहे. जमावाने नेपाळी काँग्रेसच मुख्यालय पेटवून दिलं. नेपाळमधील या विरोध प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर काठमांडू स्थित हिल्टन हॉटेलला आंदोलकांनी लक्ष्य केलं. जमावाने हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली. हे हॉटेल नेपाळच्या एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मालकीच आहे असं आंदोलकांच म्हणणं होतं.
इंटरनॅशनल विमानतळ बंद करण्याची तयारी
नेपाळमधील परिस्थिती बिघडत चाललेली असताना त्रिभुवन इंटरनॅशनल विमानतळ बंद करण्याची तयारी सुरु आहे. मंत्र्यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानाहून सैन्याच्या हेलिकॉप्टरने विमानतळावर आणलं जात आहे. पाच हेलिकॉप्टरद्वारे मंत्र्यांना सुरक्षित बाहेर काढलं जात आहे. याच क्रमात पंतप्रधानांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची तयारी सुरु आहे. राजधानी काठमांडूत तणावपूर्ण स्थिती आहे.
कर्फ्यू कुठे-कुठे असेल?
नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या हिंसक झडपांनंतर मंगळवारी काठमांडू,ललितपूर आणि भक्तपूर जिल्ह्याच्या विभिन् भागात प्रशासनाने कर्फ्यू लावला आहे. काठमांडू जिल्हा प्रशासन कार्यालयाने रिंग रोड क्षेत्रात सुकाळी 8:30 वाजल्यापासूनअनिश्चितकाळासाठी कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. हा कर्फ्यू रिंग रोडच्या आतल्या सर्व भागात असेल. यात बलकुमारी ब्रिज, कोटेश्वर, सिनामंगल, गौशाला, चाबहिल, नारायण गोपाल चौक, गोंगाबू, बालाजू, स्वयम्भू, कलंकी, बल्खु आणि बागमती ब्रिजचा समावेश आहे.