भारत पाकिस्तान सामन्याची तिकीट व्रिकी थंडावली, नेमकं काय झालं?
GH News September 10, 2025 12:17 AM

आशिया कप स्पर्धेला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात सुरु आहे. आशिया कप स्पर्धा 28 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. पण सर्वांचं लक्ष हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे लागून आहे. कारण हे दोन्ही संघ आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे मैदानातून सामना पाहण्यासाठी झुंबड उडते. काही तासातच तिकीट विक्री होते अशी स्थिती असते. पण आशिया कप स्पर्धेच्या सामन्याची तिकीट विक्री अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. असं का म्हणून क्रीडाप्रेमींना प्रश्न पडला. भारत पाकिस्तान सामन्याची प्रिमियम तिकीट आतापर्यंत विकली गेलेली नाहीत.

रिपोर्टनुसार, व्हिआयपी सुइट्स ईस्टमध्ये अजूनही तिकीट शिल्लक आहेत. टिकटिंग पोर्टल्स वियागोगो आणि प्लॅटिनमलिस्टवर दोन सीट्सची किंमत 2 लाख 57 हजार 815 रुपये आहे. या पॅकेजमध्ये अमर्यादीत खाणं आणि पेये, पार्किंग पास, व्हिआयपी क्लब/लाउंजमध्ये प्रवेश आणि खासगी प्रवेश समाविष्ट आहे. रॉयल बॉक्समध्येदेखील तिकीटे शिल्लक आहेत. याची किंमत दोन लोकांसाठी 2 लाख 30 हजार 700 रुपये आहे. तर स्काय बॉक्स ईस्टची किंमत 1 लाख 67 हजार 851 रुपये आहे.

आयोजकांनी तिकीट प्रणालीत बदल केल्याने गोंधळ उडाला आहे. कारण यावेळी तिकीट विकत घेणं वाटतं तितकं सोपं नाही. यापूर्वी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी थेट तिकिटे खरेदी करता येत होती. पण यावेळी ग्रुप पॅकेज खरेदी करावे लागेल. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्यांना एकूण सात सामन्यांची तिकिटे रेदी करावी लागतील. त्यामुळे ग्रुप पॅकेज खरेदी करणं महाग पडत आहे. क्रिकेटप्रेमींना ही प्रणाली आवडली नाही. अनेक चाहत्यांचे फक्त भारत-पाकिस्तान सामना पहायचा आहे आणि इतर सामन्यांमध्ये रस नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान आणि हॉटेल्सच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे. पण येत्या दोन तीन दिवसात तिकीट विक्री होईल असा विश्वास आयोजकांना आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.