राजकारण म्हटलं की स्वार्थ हा आलाच. प्रत्येक राजकारणी व्यक्ती हा प्रत्येक गोष्टीत स्वत:चा स्वार्थ पाहतो, असे अनेकदा म्हटले जाते. पण तेलंगणाचे तरुण आणि तडफदार मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे यासाठी अपवाद ठरले आहेत. रेवंत रेड्डी यांनी विकासकामांमध्ये सर्वसामान्य आणि राजकीय नेत्यांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही, हे केवळ बोलून दाखवले नाही, तर स्वतःच्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. नागरकुरनूल जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी कोंडारेड्डीपल्ली येथे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घेतलेला एक निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे त्यांची एक वेगळीच प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये तयार झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?सध्या कोंडारेड्डीपल्ली गावात रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. याच कामादरम्यान तेलंगणाचे तरुण मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक आदर्श घालून दिला आहे. नागरकुरनूल जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी कोंडारेड्डीपल्ली या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होते. या कामात अडथळा येत असल्याचं लक्षात येताच त्यांनी कोणताही विचार न करता स्वतःच्या घराची भिंत पाडण्याचे आदेश दिले.
या रस्त्याच्या कामासाठी गावातील ४३ घरांचे काही भाग पाडण्यात आले होते. त्यामुळे गावकऱ्यांना नुकसान भरपाई देखील देण्यात आली. याच दरम्यान त्यांच्या स्वत:च्या घराची भिंतीचा अडथळा रस्त्याला येत होता. मात्र मुख्यमंत्री रेड्डी यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या घराची भिंत पाडण्याचा निर्णय घेतला. यामुळे गावातील लोक त्यांचे कौतुक करत आहेत. त्यांनी दाखवलेल्या निस्वार्थ वृत्तीमुळे आणि लोकांच्या हिताचा विचार केल्यामुळे त्यांची प्रशंसा होत आहे.
हे काम मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दोन दिवसांपूर्वीच करण्यात आले. आता त्या जागेवर पुन्हा बांधकाम सुरू आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी देवसहायम यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनीच रस्ता रुंदीकरणात नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वीच ज्या लोकांची घरे या कामासाठी पाडली गेली, त्यांना योग्य ती नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळेच रस्त्याचे काम वेळेत सुरू झाले, अशी प्रतिक्रिया देवसहायम यांनी दिली.
केवळ एका भिंतीचा त्याग केला नाही तर…एका गावकऱ्याने सांगितले की, “ते आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तरीही त्यांनी कोणताही दुजाभाव न ठेवता आपली भिंत पाडण्याचा आदेश दिला. त्यांनी स्वतःच्या फायद्याचा विचार केला नाही, तर गावाच्या विकासाचा विचार केला. त्यामुळे असा नेता मिळणे हे गावाचे भाग्य आहे. दरम्यान रेवंत रेड्डी यांनी केवळ एका भिंतीचा त्याग केला नाही, तर त्यांनी एक मोठा संदेश दिला आहे. विकासकामांमध्ये कोणताही भेदभाव होणार नाही. जनतेच्या हिताला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असेल, असा संदेश यातून देण्यात येत आहे. हा निर्णय अनेक तरुण नेत्यांसाठी एक आदर्श बनला आहे.