Lalbaugcha Raja Visarjan: लालबागचा राजा विसर्जन विलंबाची चौकशी करा! मच्छीमार समितीची भूमिका
esakal September 10, 2025 07:45 AM

मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाविरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने चौकशीची मागणी केली आहे. विसर्जन प्रक्रियेतील गोंधळामुळे गणरायाचे विसर्जन चंद्रग्रहणाच्या वेळी झाल्याने लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच दर्शनादरम्यान भाविकांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे आरोपही समितीने केले. समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात ई-मेलद्वारे तक्रार केली आहे.

लालबागच्या राजाची स्थापना १९३४मध्ये कोळी समाजातील महिलांनी केली होती. आता या उत्सवाचे बाजारीकरण झाले असून, भक्तांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समितीने केला आहे. एका मुलीला दिलेल्या अमानुष वागणुकीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वसामान्यांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याचे तांडेल यांनी सांगितले. तक्रारीत मंडळातील जबाबदार सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, दोषी कार्यकर्त्यांना अटक करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Thane News: मुंब्रात इमारतीचा काही भाग कोसळून दुर्घटना, एका महिलेचा मृत्यू

व्हीआयपी संस्कृती रोखण्यासाठी दर्शन प्रक्रियेत बदल करून सर्वसामान्यांसाठी सोयीस्कर व्यवस्था करावी, चेंगराचेंगरी टाळण्यासाठी मंडप मोकळा ठेवावा, असेही समितीने सुचवले आहे. श्रीगणेश हे कोणाच्या मालकीचे नसून ते सर्वांचे आहेत. विसर्जनावेळी कोळी बांधवांना डावलण्यात आले, हा कोळी समाजाचा अपमान आहे. ‘लालबागचा राजा’ पुन्हा समाजाच्या भावनांशी जोडला जावा, अशी मागणी समितीने केली आहे.

नेरूळमध्ये सात गणेश मंडळांवर गुन्हे

गणेशोत्सवकाळात पोलिसांनी वारंवार सूचना करूनही ध्वनिप्रदूषण टाळण्याऐवजी अनेक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या क्षमतेच्या ध्वनिप्रक्षेपण यंत्रणेचा वापर करून तसेच फटाके यांसारख्या ज्वलनशील पदार्थ सार्वजनिक रस्त्यावर फोडून ध्वनिप्रदूषण केल्याचे आढळून आले. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी आपल्या हद्दीतील सात गणेशोत्सव मंडळांविरोधात ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने गणेशोत्सवापूर्वीच सर्व मंडळांच्या बैठका घेत रात्री १२ ते पहाटे ६ या वेळेत ध्वनिक्षेपण यंत्रणा वापरण्यास तसेच मोठ्या क्षमतेच्या ध्वनिप्रक्षेपण यंत्रणेचा वापर करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

एखाद्या देशात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यासाठी कोणती सिस्टीम वापरतात? वाचा संपूर्ण प्रक्रिया

दरम्यान, मंगळवारी (ता. २) गौरी-गणपती विसर्जनाच्या दिवशी रात्री ११ वाजता नेरूळ सेक्टर-८ मधील विश्वशांती सोसायटीसमोरील जय भवानी रोडवरील मंडळाकडून मोठ्या आवाजात ध्वनिप्रक्षेपण यंत्रणेचा वापर करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी संबंधित मंडळाविरोधात गुन्हा दाखल केला. अनंत चतुर्थीच्या दिवशीदेखील काही मंडळांनी ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करून सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. यामध्ये सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ सेक्टर ए नेरूळ, श्री गणराज सार्वजनिक उत्सव मंडळ जुईनगर, बाळ गोपाळ मित्रमंडळ, सेक्टर जुईनगर, सार्वजनिक गणेश मंडळ सेक्टर-१८ नेरूळ, भारत सोसायटी सेक्टर जुईनगर, सार्वजनिक सांस्कृतिक उत्सव मंडळ, सेक्टर नेरूळ या सहा मंडळांचा समावेश आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.