Crime News : नाशिक रोड पोलिसांची मोठी कामगिरी; १६ लाखांचे दागिने परत
esakal September 10, 2025 11:45 AM

नाशिक, नाशिक रोड: अनेकदा घरफोडीत चोरीला गेलेले दागिने परत मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र, नाशिक रोड पोलिसांनी दाखविलेल्या दक्षतेमुळे पळसे (ता.नाशिक) येथील वृद्ध दांपत्याला त्यांचे चोरीला गेलेले तब्बल १६ लाख रुपये किमतीचे दागिने परत मिळवून दिले. विशेष म्हणजे घरातून दागिने चोरीला गेले असल्याची कल्पना या दांपत्याला नव्हती; परंतु मुलाच्या उपचारांसाठी साठवून ठेवलेले दागिने मिळाल्याने दांपत्याने पोलिसांविषयी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

पळसे येथील विमल सुर्यभान कुन्हे (वय ७०) यांच्या घरी झाली होती. या चोरीत चोरट्याने कुन्हे यांच्या घरातून सुमारे १६ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले होते. घरफोडीत चोरलेले दागिने रेल्वे स्टेशन परिसरात संशयित हा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई विशाल कुंवर व समाधान वाजे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस कर्मचारी यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली.

त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचत नवले ब्रीजखालून शुभम विकी मोरे (वय २४, रा. विजय नगर, चेहडी पंपिंग, ता. नाशिक) यास अटक केली. त्याच्या झडतीत सुरुवातीला १०.७० ग्रॅम वजनाची, एक लाख रुपये किंमतीची सोन्याची पोत मिळाली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत आणखी दागिने लपवून ठेवल्याचे सांगितले.

त्याच्याकडून सोन्याच्या पोती, मनचली पोत, एकदाणी पोत, कानातले, लॉकेट, अंगठ्या, पाटल्या व बांगड्या असे मिळून १५ तोळे वजनाचे, अंदाजे १६ लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले. कुन्हे दांपत्याने आपले लग्नातील दागिने आठवणी म्हणून घरात सुरक्षित ठेवले होते. दागिने चोरीनंतर त्यांना मानसिक धक्का बसला होता. मात्र, पोलिसांनी तेच दागिने मूळ स्वरूपात परत दिल्याने त्यांनी आनंदाश्रूंनी पोलीस विभागाचे आभार मानले.

Sangli Crime: 'शेगावमध्ये घरफोडीत ४ लाखांचे सोने पळविले'; जत पोलिसांत गुन्हा, शोधासाठी पथक रवाना

यांनी केली कामगिरी

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे व सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) बडेसाब नाईकवाडे तसेच गुन्हेशोध पथकाचे प्रवीण सूर्यवंशी, संदीप पवार, अविनाश देवरे, विजय टेमगर, नितीन भामरे, अजय देशमुख, नाना पानसरे, पूजा आहिरे यांनी ही कामगिरी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.