सकाळ इम्पॅक्ट
चिंचवड, ता.९ ः चिंचवडगावातील चापेकर चौकामध्ये पुण्याहून येणाऱ्या सर्व पीएमपी बससाठी थांब्यावर प्रवाशांची निवारा शेड अभावी गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच त्याची तत्काळ दखल घेत पीएमपी प्रशासनाने निवारा शेड उभारले आहे.
या थांब्यावर निवारा शेड नसल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग प्रवाशांना ऐन उन्हाळा-पावसाळ्यात दररोज त्रासाला सामोरे जावे लागत असे. बसची वाट पाहण्यासाठी तसेच बसमधून उतरल्यानंतर प्रवासी हे थेट पदपथावर उतरत असल्यामुळे गर्दी होत असे. त्यामुळे पादचाऱ्यांनाही चालताना अडथळा होत होता. त्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता. ‘चापेकर चौकात पीएमपीचे प्रवासी पदपथावर’ या शीर्षकाखाली ही बातमी ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पीएमपीएलचे जनसंपर्क अधिकारी किशोर चव्हाण यांनी तिची तत्काळ दखल घेत या ठिकाणी निवारा शेड व अधिकृत बस थांबा केला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली. त्याबद्दल चिंचवडमधील प्रवाशांकडून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
CWD25A01995