‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात शंतनूची भूमिका साकारलेला अभिनेता सिद्धार्थ रेचं वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं होतं. 2004 मध्ये एके दिवशी जेवताना त्याला अचानक उचकी आली आणि त्यानंतर त्याने आपले प्राण गमावले. 1992 मध्ये त्याने अभिनेत्री शांती प्रियाशी लग्न केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शांती प्रिया सिद्धार्थविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. त्याच्या निधनानंतर तिचं आयुष्य कशा पद्धतीन पूर्णपणे बदललं, याविषयी तिने सांगितलं.
‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी अचानक लोकांना माझ्यापासून दूर ढकलू लागले. मी स्वत: त्यांना माझ्यापासून दूर केलं. मी रडले नाही. कारण मला हतबल व्हायचं नव्हतं. मला कोणाचीच मदत घ्यायची नव्हती. सर्व विधी पार पडल्यानंतर मला अचानक जाणवलं की, ओह.. तो आता आमच्यासोबत कधीच नसणार आहे. माझ्या आईने मला विचारलं की तुला परत घरी यायचंय का? मी तिलाही नकार दिला. मी आतून रडत होते, पण चेहऱ्यावर कधीच ते दिसू दिलं नाही.”
सिद्धार्थच्या निधनानंतर शांती प्रियाच्या राहणीमानातही बराच बदल झाला. तिची लाइफस्टाइल पूर्णपणे बदलली. मानसिकदृष्ट्या ती प्रचंड संघर्ष करत होती. याविषयी तिने पुढे सांगितलं, “मला कोणतेच रंग आवडत नव्हते. मी फक्त पांढऱ्या रंगाचेच कपडे परिधान करत होती. माझ्या डोक्यात सतत काहीतरी विचार सुरू असायचे. एकेदिवशी जेव्हा आई माझ्याकडे आली, तेव्हा मला अशा अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला. माझ्या मुलांकडे पाहून ती मला ओरडली. मी जिवंतपणी मेल्यासारखी वागत होते.”
View this post on Instagram
A post shared by Shanthi Priya (@shanthipriya333)
“आईने मला समजावलं की, तुझ्या मुलांकडे बघ, त्यांच्याकडे पालक म्हणून आता तू एकटीच आहेस. मी अशिक्षित आणि सिंगल मदर होते तरी तुला आणि तुझ्या भाऊबहिणींना चांगलं आयुष्य देऊ शकले. तुझ्या बाबतीत तू आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेस, स्वतंत्र आणि शिक्षित आहेस. आईने सांगितलेली ही गोष्टी माझ्या मनाला लागली. एक आई म्हणून मला माझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली. तेव्हा मी पुन्हा स्वत:ला सावरलं आणि मुलांसाठी जगू लागले”, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.