Abhishek Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या रायनंतर तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चन यानेसुद्धा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ऐश्वर्याने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली होती. तिच्या नावाचा आणि फोटोंचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी कोणी करू नये, यासाठी तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्याचप्रमाणे एआयच्या मदतीने तिचे फेक अश्लील कंटेंट तयार करून ते व्हायरल करणाऱ्यांना आळा बसावा, यासाठी तिने हे पाऊल उचललं होतं. तिच्यानंतर आता अभिषेक बच्चनसुद्धा त्याच्या प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला आहे.
‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, विविध वेबसाइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना त्याचे फोटो, बनावट व्हिडीओ आणि बनावट पद्धतीने तयार केलेला अश्लील कंटेंट वापरण्यापासून रोखण्याची विनंती अभिषेकने केली. अभिषेकचे एआय-जनरेटेड व्हिडीओ तयार केले जात आहेत आणि त्याच्या ऑटोग्राफचे बनावट फोटो बनवले जात असल्याचं त्याच्या वकिलांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर एआयद्वारे फेक व्हिडीओ तयार करून अश्लील कंटेंटसुद्धा बनवला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. डीपफेक फोटो आणि व्हिडीओंमुळे प्रतिमा मलिन होत असल्याची, प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याची तक्रार अभिषेक आणि ऐश्वर्याकडून करण्यात आली आहे.
ऐश्वर्याच्याव्यक्तिमत्त्वाचा आणि प्रसिद्धीच्या अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी एक आदेश पारित केलं जाईल, असं दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी सूचित केलं. त्याचप्रमाणे विविध संस्थांना तिच्या संमतीशिवाय तिचं नाव, फोटो आणि आवाज व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्यापासून रोखण्यात येईल. ऐश्वर्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या URL काढून टाकण्यासाठी पुढील निर्देश जारी करणार असल्याचं न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने मंगळवारी म्हटलं होतं. आता अभिषेकच्या बाबतीतही न्यायालय असेच निर्देश देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याआधी अनेक कलाकारांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. अभिषेकचे वडील अमिताभ बच्चन यांनीसुद्धा 2022 मध्ये असंच पाऊल उचललं होतं. अनेकदा चुकीच्या हेतूने सेलिब्रिटींच्या फोटोंचा, नावाचा आणि फेक व्हिडीओंचा वापर केला जातो. याला आळा बसावा, यासाठी कलाकारांनी कायदेशीर मार्ग अवलंबला आहे.