कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी (IPS Anjali Krushna) यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की असा दावा शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजितादादांसाठी (Ajit Pawar) त्यांचा पुतण्या समोर आल्याचे चित्र दिसत आहे. याप्रकरणात आमदार अमोल मिटकरी यांनी भूमिका जाहीर केली होती. पण पुढे पक्षातून याप्रकरणावर पडदा टाकण्याचे काम होत असल्याचे दिसते.
मित्र पक्षाकडून मीडिया ट्रायल?
रोहित पवार यांनी याप्रकरणात महायुतीमधील घटक पक्षांचं नाव न घेता मोठा आरोप केला आहे. अजितदादांच्या मित्र पक्षाकडून मीडिया ट्रायल करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील, असा चिमटा त्यांनी काढला.
कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण…
— Rohit Pawar (@RRPSpeaks)
रोहित पवारांचा रोख कुणावर?
राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या दोन तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी केला. असो पक्षात “चहापेक्षा किटली गरम असणारे” एक दोन सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला यानिमित्ताने आलाच असेल, असा टोला त्यांनी लगावला. पण यानिमित्ताने रोहित पवारांचा रोख नेमका कुणावर होता याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे प्रदेशाध्यक्षसुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. पण यावेळी त्यांनी कुणाचं नाव घेतलेलं नाही.