पत्नीच्या मारेकऱ्याला सहा वर्षांनी अटक
पनवेल, ता. ९ (वार्ताहर) : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जिवंत जाळणाऱ्या मनोहर सरोदे (५०) याला कामोठे पोलिसांनी जेरबंद केले आहे. सहा वर्षांपासून पोलिसांना चकवा देताना खोटे नाव धारण करून तो हैदराबादमध्ये राहत असल्याचे तपासात आढळून आले आहे.
कामोठेत राहणारा मनोहर बिगारी काम करीत होता. दारूचे व्यसन असल्याने चारित्र्याचा संशयातून बायकोला शिवीगाळ करून मारहाण करीत होता. ४ डिसेंबर २०१९ रोजी रात्री किरकोळ कारणावरून त्याने मारहाण केली. तसेच पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी पल्लवीला गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल केले, मात्र सात दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेत कामोठे पोलिसांनी आरोपीविरोधात हत्या, जीवे मारण्याचा प्रयत्न, छळवणूक इत्यादी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर मनोहर सरोदे मूळ गावीदेखील गेला नव्हता. तसेच मोबाईलचा वापर करीत नसल्यामुळे त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
----------------------------------
खोट्या नावाने वास्तव्य
सहा वर्षे पोलिसांना चकवा देणारा मनोहर हैदराबादच्या जहांगिराबाद परिसरात पिंटू कुमार नावाने राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत तायडे, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह चव्हाण, पोलिस हवालदार संजय झोळ, प्रशांत जाधव, पोलिस नाईक सचिन ठोंबरे, पोलिस शिपाई प्रवीण पाटील, प्रमोद कोकाटे, नितीन गायकवाड, राजेंद्र इलग, दत्तात्रय जाधव यांच्या पथकाने त्याला हैदराबादमधून अटक केली.