अभिनेत्री शांती प्रियाने 1987 मध्ये फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. 1991 मध्ये तिला पहिल्यावहिल्या बॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाली होती. ‘सौगंध’ या चित्रपटात ती अक्षय कुमारची पहिली हिरोइन बनली होती. त्यानंतर तिने ‘मेरे सजना साथ निभाना’ आणि ‘फूल और अंगार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. करिअर शिखरावर असताना शांती प्रियाने प्रेमासाठी इंडस्ट्री सोडली. तिने 1992 मध्ये ‘बाजीगर’ फेम अभिनेता सिद्धार्थ रे याच्याशी लग्न केलं. दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी भिन्न होती. त्यामुळे त्याच्या संस्कृतीला समजून घेण्यासाठी आणि कुटुंबाला प्राधान्य देण्यासाठी शांती प्रियाने इंडस्ट्री सोडली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती सिद्धार्थविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत शांती प्रियाने त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. “आम्ही एका कार्यक्रमानिमित्त भेटलो होतो. आम्हाला डान्स रिहर्सल करायची होती. जेव्हा मी त्याच्या डोळ्यात पाहिलं, तेव्हाच माझ्या हृदयात एक खास भावना जागृत झाली. तो खूप मोठ्या कुटुंबातून आला होता, पण त्याच्यात कधीच तो अहंकार दिसला नाही. त्याचा पोशाखही अत्यंत सर्वसामान्य असायचा. हळूहळू आम्ही एकमेकांच्या जवळ येत गेलो आणि भेटीच्या वर्षभरातच आम्ही लग्न केलं. लग्नानंतर मला माझ्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घ्यायचा होता. मुंबई माझ्यासाठी खूप नवीन होतं. मी दक्षिण भारतातून आले होते आणि त्याच्या कुटुंबात महाराष्ट्र आणि बंगालचं मिश्रण होतं. मला ते सर्व समजून घ्यायचं होतं. त्यांनी मला अभिनय सोडण्यास सांगितलं नव्हतं.”
View this post on Instagram
A post shared by Shanthi Priya (@shanthipriya333)
शांती प्रिया आणि सिद्धार्थ यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही सुरळीत सुरू होतं. परंतु अचानक 2004 मध्ये सिद्धार्थला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचं निधन झालं. त्या घटनेबद्दल शांती प्रियाने पुढे सांगितलं, ‘ते धक्कादायक होतं. आम्ही रात्रीचं जेवण जेवत होतो आणि नेहमीप्रमाणे तो आमच्या छोट्या मुलाला काही चांगल्या गोष्टी शिकवत होता. डिनर टेबलवर मी, तो आणि आमची दोन्ही मुलं जेवत होतो. तेव्हा अचानक त्याला उचकी आली आणि तो कोसळला. मी काहीच करू शकले नव्हते. एखाद्याला हृदयविकाराचा झटका येताना पाहण्याची माझी ती पहिलीच वेळ होती.’
‘घरातल्या मोलकरीणीने त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. आमच्या इमारतीत एक डॉक्टर राहायचे, आम्ही त्यांना बोलावलं. कसंबसं आम्ही सिद्धार्थला सोफ्यावर झोपवलं. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले, पण त्याचा जीव वाचू शकला नाही. त्याला मृत घोषित करताच मी सुन्न झाले. नेमकं काय करायचं, कशी प्रतिक्रिया द्यायची हेच मला त्यावेळी समजत नव्हतं. माझ्या भावना व्यक्त करू की जबाबदाऱ्या सांभाळू हेच मला कळत नव्हतं’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.