Success Story: भंगारातून करोडो कमावतोय, अनेकांना देतोय जॉब, मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करणारेही त्याच्या पुढे फिके
Tv9 Marathi September 10, 2025 05:45 PM

कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो, फक्त तो करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी लागते. जम्मू काश्मिरचे नाव ऐकले तर पर्यटन व्यवसाय आपल्या डोळ्यासमोर येतो. मात्र दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील गदीहामा गावातील तारिक अहमद घनी यांनी भंगारातून एखादा व्यक्ती श्रीमंत कसा होऊ शकतो हे जगाला दाखवले आहे. तारिक हे आज संपूर्ण परिसरासाठी प्रेरणास्थान बनले आहेत. कठोर परिश्रम आणि सकारात्मक विचाराने कोणतेही अशक्य काम शक्य होऊ शकते हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांची वार्षिक उलाढाल आता कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

पर्यावरण संरक्षणासाठी फायदेशीर

तारिक अहमद घनी यांचा हा व्यवसाय पर्यावरण संरक्षणाचेही काम करत आहे. तारिक हे प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करतात, त्याच्यावर प्रक्रिया करतात आणि तो पुन्हा वापरतात. तारिक यांच्या या व्यवसायामुळे परिसरात वाढणारा कचरा आणि प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा निघाला आहे. ते अप्रत्यक्षरित्या पर्यावरण संरक्षणात महत्त्वाचे योगदान देत आहेत.

50 तरुणांना रोजगार

भंगाराच्या व्यवसायामुळे तारिक अहमद केवळ स्वत: श्रीमंत होत नाहीत तर परिसरातील तरुणांसाठी त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करण्याच्या त्यांच्या युनिटमध्ये 50 पेक्षा जास्त तरुण काम करत आहेत. यातील अनेकजण पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले युवक आहेत. यामुळे तरुणांना रोजगार मिळाला असून पर्यावरणाचेही संरक्षण होत आहे.

कठोर परिश्रमामुळे मिळाले यश

तारिक अहमद यांनी हे यश कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवायही केवळ योग्य विचारसरणी, कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर मिळवले आहे. त्यांनी केवळ एक व्यवसाय उभारला नाही तर तो सतत पुढे नेत लोकांनाही त्यात सहभागी करुन घेतले आहे. त्यामुळे त्यांनाही यश मिळत गेले. तारिक अहमद गनी यांचे नाव काश्मीरमधील निवडक उद्योजकांमध्ये घेतले जाते ज्यांनी सामाजिक आणि पर्यावरणीय बदलाचा मार्ग दाखवला आहे. ते इतरांसाठी प्रेरणा बनले आहेत. कचऱ्यातही सुवर्ण संधी लपलेल्या असू शकतात असे त्यांच्या प्रवासातून समोर आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.