आळेफाटा, ता. ९ : मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामातील ॲल्युमिनिअम धातूची तार चोरी करणाऱ्या अट्टल चोरांना आळेफाटा (ता. जुन्नर) पोलिसांनी अटक केली.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी माहिती दिली की, ज्ञानेश्वर रामकृष्ण बनकर (रा. रेणुका नगर, जि. अहिल्यानगर) हे इलेक्ट्रिक ठेकेदार असून, त्यांचे मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे काम चालू आहे. त्यांनी या कामाचे इलेक्ट्रिक साहित्य (आसी कंडक्टर डॉग १०० तारेचे ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे बंडल) बोरी बुद्रुक येथील आनंद आश्रम या ठिकाणी ठेवले होते. ते २७ ऑगस्ट रोजी चोरट्यांनी चोरून नेले. याबाबतचा गुन्हा दाखल केला होता. आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी पथकाला गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार
गुन्हे शोध पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सौरभ ओंकार तांगडे व त्याच्या साथीदारांनी सदर गुन्हा केला आहे. त्यानुसार शोध पथकाने नारायणगाव परिसरात जाऊन सौरभ यास ताब्यात घेतले. तसेच, त्याने गुन्ह्यात वापरलेली अल्टो मोटार (क्र. एमएच ४६ एन ६१८६) व टाटा कंपनीची छोटा हत्ती (क्र. एमएच १२ इक्यू ७२१७) ताब्यात घेतले. त्यांनी विकास देवराम कुऱ्हाडे (रा. सुलतानपूर, ता. जुन्नर) याच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली. या आरोपींकडून गुन्हा करतेवेळी वापरलेली दोन वाहने, तसेच ॲल्युमिनियम तारेचे बंडल, असा एकूण १२ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेला सूचनेप्रमाणे पोलिस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, संदीप माळवदे, नवीन आरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप, सखाराम जंबड, प्रशांत तांगडकर यांनी केली