Nashik Education News : 'रविवार माझा हक्काचा': चोळमुखच्या विद्यार्थिनींनी चंद्र-सूर्यग्रहणाचे प्रात्यक्षिक दाखवले
esakal September 10, 2025 11:45 AM

नाशिक : चोळमुख (ता. पेठ) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी विज्ञानाच्या विश्वात झेप घेतली आहे. सूर्य, पृथ्वी, ग्रह, चंद्रग्रहण व सूर्यग्रहण यांचा अभ्यास केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित न ठेवता त्यांनी प्रत्यक्ष नाट्यप्रयोग, आकृती व सादरीकरणातून साकारला.

मुख्याध्यापक पी. एस. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षिका प्रियांका पांडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थिनींना सूर्यमालेबाबत सखोल माहिती देण्यात आली. शालेय सुटीच्या दिवशी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरील अनौपचारिक शिक्षण मिळावे, या हेतूने ‘रविवार माझा हक्काचा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या अठराव्या भागाची सुरवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली.

सुरवातीला विद्यार्थिनींनी अनापान (विपश्यना) साधना केली. “विज्ञान समजले की ते अधिक सोपे वाटते” या भावनेतून अधीक्षिका पांडे यांनी या उपक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. विद्यार्थिनींनी सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाचा अभ्यास चार्ट व आकृतीतून सादर केला.

MUHS summer exam 2025 : ‘एमयुएचएस’च्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने; राज्यातील १३ हजार विद्यार्थी प्रविष्ट

चंद्रग्रहणानिमित्ताने विद्यार्थिनींनी चंद्रग्रहण व सूर्यग्रहणाची कारणे, त्यांचे प्रकार आणि ‘ब्लड मून’चे प्रात्यक्षिक उत्साहाने दाखवले. पृथ्वी, सूर्य व चंद्र एका रेषेत आल्यास होणारे चंद्रग्रहण तसेच सूर्यग्रहणाची भौगोलिक वैशिष्ट्ये त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.