केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये मोठा बदल करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला दिवाळीपर्यंत मोठं गिफ्ट मिळेल असं सांगितलं होतं.
पण त्याआधीच सरकारने खुशखबर दिली आहे. आता 22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटी स्लॅब लागू होणार असून, फक्त दोनच जीएसटी स्लॅब असतील. यामुळे अनेक वस्तू स्वस्त होतील आणि नागरिकांचा खर्च कमी होणार आहे.
जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. तेल, शॅम्पू, साबण यांवरील कर 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.
बिस्कीट, नमकीन यांवरील कर देखील कमी झाला आहे. आधी 5 रुपयांच्या बिस्कीटावर 60 पैसे टॅक्स लागत होता, आता फक्त 15 पैसे लागतील.
दूध आणि पनीरवर कोणताही जीएसटी राहणार नाही. तूप व बटरवरचा कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के झाला आहे.
पिझ्झा-ब्रेडवरही आता 5 टक्के जीएसटी लागू आहे. चॉकलेट आणि मिठाईंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून थेट 5 टक्क्यांवर आणला आहे.
कपडे व शूजदेखील स्वस्त होणार आहेत. 2500 रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर आता फक्त 5 टक्के कर लागेल.
शिक्षणासंबंधित वस्तूंना पूर्ण सूट देण्यात आली आहे. वह्या, पुस्तके, पेन्सिल, रबर, कटर यांवर आता कोणताही जीएसटी राहणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा फायदा होणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील दरातही बदल झाला आहे. एसीवरचा कर 28 टक्क्यांवरून 18 टक्के झाला आहे. तर डिशवॉशर, मॉनिटर, प्रोजेक्टर यांवरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.