मोकाट घोड्यांमुळे दुचाकीस्वार त्रस्त
श्रीवर्धन तालुक्यात पाच दिवसांत दुसरा अपघात
श्रीवर्धन, ता. ९ (वार्ताहर)ः तालुक्यातील रस्त्यांवर मोकाट फिरणारी जनावरे पादचाऱ्यांसाठी मोठी समस्या बनली आहेत. या जनावरांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत, तर रात्री-अपरात्री रस्त्यावरून भटकणारे घोडे अपघाताला निमित्त ठरत आहेत.
श्रीवर्धन तालुक्यात दीड ते दोन वर्षांपासून पाळीव प्राण्यांबाबत मालकांकडून निष्काळजी दाखवण्यात येते. अन्न-पाण्याच्या शोधात भटकणारे हे पाळीव प्राणी वाड्यांमध्ये शिरल्याने फळबागांचे नुकसान करत आहेत. आराठी येथे पर्यटकाच्या वाहनाला घोड्याने धडक दिल्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली होती. रात्री-अपरात्री रस्त्याच्या मध्यभागी अथवा कडेला उभ्या राहणाऱ्या घोड्यांमुळे भट्टीचा माळ, बोर्लीपंचतन येथे घोड्याला धडकल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील उनाड जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे. श्रीवर्धन नगर परिषद मुख्याधिकारी विराज लबडे यांनी श्रीवर्धन नगर परिषद हद्दीत उनाड घोडे, जनावरे आढळल्यास संबंधित मालकांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
-----------------------------------
‘कार्यालयात जनावरांना बांधू’
गटविकास अधिकारी यांनी सरपंच, प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना ग्रामपंचायत हद्दीतील मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता, परंतु गटविकास अधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली. उनाड घोड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे श्रीवर्धन शहर व तालुक्यातील नागरिकांनी तहसीलदार, पंचायत समिती, श्रीवर्धन नगर परिषद, पोलिस ठाणे येथे सोमवारी (ता. ८) निवेदन दिले आहे. तसेच प्रशासनाने तातडीन जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी अन्यथा शासकीय कार्यालयात जनावरांना आणून बांधू, असा इशारा दिला आहे.