ज्वेल ऑफ नवी मुंबई उद्यानाबाहेर सर्पदंश
ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईची सर्वाधिक गर्दी; परिसरात भीतीचे वातावरण
जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : ज्वेल ऑफ नवी मुंबई उद्यानाबाहेर पहाटे व्यायामासाठी आलेल्या नागरिकांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडत आहेत. नेरूळ सेक्टर-१० येथील व्यक्तीचा सर्पदंशानंतर जीव धोक्यात पडला होता, मात्र नशीब बलवत्तर म्हणून वेळेत उपचार झाल्याने सध्या ते सुरक्षित आहेत. पहाटेची निरव शांतात असताना अचानक हा प्रकार घडल्याने वाटसरूंमध्ये भीती पसरली आहे.
नेरूळ येथील महापालिकेच्या नावाजलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील उद्यानामध्ये परिसरातील नागरिक व्यायाम, चालण्यासाठी दररोज येत असतात, शिवाय काही नागरिकतर दूरवरूनही येत असतात. सुट्टीच्या दिवशी उद्यानामध्ये सर्वाधिक गर्दी असते, मात्र सध्या सततच्या पावसामुळे उद्यानाजवळील झाडीत पाणी साचल्याने येथील सर्प बाहेर येत आहेत. त्यामुळे सर्पदंशाच्या घटना घडत आहेत. अशाच एका घटनेत पहाटेच्या वेळेस चालण्यासाठी आलेल्या मारूती खाटपे यांना उद्यानाच्या बाहेरील रस्त्यावर सर्पदंश झाला. रस्त्यावर चालत असताना समोरील आलेल्या वाहनाची लाइट डोळ्यात आल्याने त्यांना रस्तावरील पायाखालील भाग दिसला नाही. त्यामुळे त्यांचा पाय रस्त्यावर पडलेल्या घोणस प्रकारच्या अतिशय विषारी सापावर पडला. त्यामुळे सापाने खाटपे यांच्या घोट्याला चावा घेतला. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी मीनाताई ठाकरे रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, मात्र या ठिकाणी याबाबत पुरेशी यंत्रणा नसल्याने त्यांना अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र जर उपचार मिळण्यास उशीर झाला असता, तर त्यांना प्राण गमवावे लागले असते. त्यामुळे परिसरात सर्पदंशाच्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
...............
सावध राहणे गरजेचे
नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या उद्यानात जुईनगर, नेरूळ, सीवूड्स आणि करावे परिसरातील अनेक नागरिक चालणे आणि व्यायाम करण्यासाठी येतात, मात्र सर्पदंशाच्या घटनेमुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये पाऊस थांबताच बिळातील साप मोकळ्या परिसरात वावरत असतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला, दगडांमधून किंवा झाडाझुडपांच्या शेजारून चालणे नागरिकांनी टाळले पाहिजे, शिवाय या परिसरात येणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.