सूक्ष्मजंतू तुमच्या झोपेवर कसे नियंत्रण ठेवतात? संशोधनातून काय समोर आलं?
BBC Marathi September 10, 2025 03:45 AM
Serenity Strull/ BBC/ Getty Images

तुमच्या आतड्यांमध्ये आणि तोंडात असणारे जिवाणू तुमच्या रात्रीच्या झोपेवर नियंत्रण ठेवू शकतात. वैज्ञानिक आता या जिवाणूंचा वापर तुम्हाला चांगली विश्रांती मिळवून देण्यासाठी करू इच्छितात.

रात्रीच्या वेळेस जेव्हा तुम्ही झोपता, तेव्हा तुमच्या शरीरात अनेक क्रिया सुरू होतात. तुमच्या शरीराच्या जवळपास प्रत्येक इंचावर आणि त्याच्या आतदेखील अब्जावधी सूक्ष्मजीव जागेसाठी धडपड करतात आणि एकमेकांना रेटतात.

हे भयंकर दृश्य डोळ्यासमोर आणून जर तुमची रात्रीची झोप उडणार असेल, तर मग हा मुद्दा लक्षात घ्या. हे सूक्ष्मजीव कदाचित तुम्हाला चांगली झोप येण्यासाठी मदतदेखील करू शकतात.

यासंदर्भातील नवीन संशोधनांमधून असं आढळून आलं आहे की जिवाणू, विषाणू आणि बुरशी यामुळं आपल्या शरीरावर मायक्रोबायोटा म्हणजे सूक्ष्मजीवांचं एक अनोखं मिश्रण तयार होतं. हे समुदाय आपल्या झोपेवर परिणाम करू शकतात.

आपल्या शरीरावरील सूक्ष्मजीवांच्या वैयक्तिक परिसंस्थेच्या रचनेनुसार, आपण किती वेळ झोपतो, त्यात सुधारणा होऊ शकते किंवा त्यात बिघाड होऊ शकतो.

झोपेच्या समस्येवर सूक्ष्मजीव ठरू शकतात उपयोगी

झोपेचा अभ्यास करणारे वैज्ञानिक ज्याला सर्केडियन रिदम म्हणतात, त्या आपल्या शरीराच्या जैविक घड्याळामुळे निर्माण झालेल्या झोपेच्या समस्यांवर मात करण्यासाठीचे नवीन मार्ग या सूक्ष्मजीवांमुळे मिळू शकतात.

सध्या अनेकजण सततच्या निद्रानाशाच्या समस्येवर मात करण्यासाठी झोपेच्या गोळ्यांवर अवलंबून असतात.

मात्र भविष्यात झोपेच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि अगदी त्रासदायक स्लीप ॲप्नियाला तोंड देण्यासाठी मैत्रीपूर्ण किंवा आपल्याला अनुकूल असलेले जिवाणू तैनात केले जाऊ शकतात.

Getty Images आपल्या तोंडातील आणि आतड्यांमधील सूक्ष्मजीवांच्या संतुलनाचा आपण कसं झोपतो यावर परिणाम होऊ शकतो.

स्लीप ॲप्नियामध्ये लोकांना झोपेत असताना सामान्यपणे श्वास घेण्यास त्रास होतो. यातून 'स्लीप हायजीन' म्हणजे चांगली झोप येण्याशी निगडीत असलेल्या चांगल्या सवयी आणि घटकांना नवीन अर्थ मिळेल.

"बऱ्याच काळापासून प्रचलित असलेला सिद्धांत असा आहे की झोपेच्या समस्या किंवा विकार हे आपल्या शरीरावरील सूक्ष्मजीवांसाठी त्रासदायक आहेत," असं जेनिफर मार्टिन म्हणतात. त्या लॉस एंजेलिसमधील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक आहेत आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनच्या बोर्डाच्या सदस्य आहेत.

त्या पुढे म्हणतात, "मात्र आता आपण पाहत असलेल्या काही पुराव्यांमधून असं दिसतं की सूक्ष्मजीव आणि आपल्या झोपेचा संबंध कदाचित दोन्ही दिशेनं प्रवास करतो."

सूक्ष्मजीवांचं शरीरातील वैविध्य आणि चांगली झोप

मे महिन्यात, झोपेवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांच्या एका परिषदेत एक नवीन संशोधन सादर करण्यात आलं. त्यातून समोर आलं की इतर अनेक अभ्यासांमधून काय समोर येतं आहे.

त्यात आढळलं की ज्या किशोरवयीन आणि तरुणांच्या तोंडात सूक्ष्मजीवांचं अधिक वैविध्य असतं, त्यांचा झोपेचा कालावधी दीर्घ किंवा चांगला असतो.

संशोधनातून असंही आढळून आलं की सामान्य किंवा चांगली झोप येणाऱ्या लोकांच्या तुलनेत ज्या लोकांना निद्रानाशाची समस्या आहे, त्यांच्या आतड्यात जिवाणूंचं वैविध्य कमी झालेलं असतं.

Getty Images जर आपण दीर्घकालापासून झोपेची समस्या असलेल्या रुग्णांमध्ये असणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या विशिष्ट कॉम्बिनेशनमध्ये बदल करू शकलो तर त्यातून त्यांच्यावर उपचार करण्याचा एक नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतो

याचा संबंध सामान्यपणे कमी निरोगी रोगप्रतिकारक शक्तीशी तसंच शरीरातील चरबी आणि साखरेच्या हाताळणीतील बिघाडाशी असतो. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि ह्रदयविकाराचा धोका वाढू शकतो.

आणखी एका संशोधनात 40 जणांचा अभ्यास करण्यात आला. त्यांनी एक महिनाभर स्लीप ट्रॅकर्स घातले होते. त्यांच्या आतड्यातील सूक्ष्मजीवांचं विश्लेषण करण्यात आलं. त्यातून असंही आढळलं की खराब झोपेचा संबंध आतड्यातील कमी वैविध्यपूर्ण सूक्ष्मजीवांशी आहे.

सोशल जेटलॅगची समस्या

त्याशिवाय, ज्या लोकांना सोशल जेटलॅग असतो, त्यांच्या आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समुदाय ज्या लोकांच्या झोपेच्या पॅटर्नमध्ये बदल झालेला नसतो त्यांच्यापेक्षा लक्षणीयरित्या वेगळा असतो, असं झोई या युकेमधील हेल्थ-टेक कंपनीनं विश्लेषण केलेल्या डेटामधून दिसून येतं.

सोशल जेटलॅग असलेल्या लोकांमध्ये आठवडभरातील त्यांच्या झोपेचा पॅटर्न आणि वीकेंडला असलेला झोपेचा पॅटर्न यात मोठ्या प्रमाणात बदल होतात.

सोशल जेटलॅग म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जैविक घड्याळ आणि त्यांचा समाजातील मिसळणं, वावर याचा ताळमेळ बिघडलेला असतो.

Getty Images

केनेथ राईट अमेरिकेतील कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठात इंटीग्रेटिव्ह फिझिओलॉजीचे प्राध्यापक आहेत.

केनेथ राईट म्हणतात, "जे लोक उशीरापर्यंत जागे राहतात आणि वीकेंडला झोपतात, जे लोक खूप जास्त तास काम करतात, अशांमध्ये सर्केडियन रिदम म्हणजे जैविक घड्याळ बिघडलेलं असतं."

"उदाहरणार्थ आपत्कालीन सेवा पुरवणारे, पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी, पॅरामेडिक्स आणि सैनिक तसंच ज्या लोकांची झोपायची वेळ आणि रात्रीच्या जेवणाची वेळ यात फार कमी अंतर असतं, अशांचं जैविक घड्याळ बिघडलेलं असतं."

ते पुढे म्हणतात, "यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर आणि चयापचयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. सामान्यपणे शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये या समस्या आढळतात. तसंच सूक्ष्मजीवांच्या समुदायात झालेला बिघाड यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो."

आहार, सूक्ष्मजीव आणि झोपेत येणारा व्यत्यय

सारा बेरी लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये आहारशास्त्राच्या प्राध्यापक आहेत आणि झोईमध्ये मुख्य वैज्ञानिक आहेत. त्या म्हणतात की झोपेत व्यत्यय येणारे लोक कमी निरोगी आहार घेतात, त्यामुळे त्यांच्या शरीरातील सूक्ष्मजीवांच्या समुदायावर परिणाम होतो.

झोईनं न केलेल्या इतर संशोधनांचा त्या उल्लेख करतात. त्यात आढळून आलं आहे की ज्या लोकांची झोप कमी असते किंवा जे कमी वेळ झोपतात ते लोक नकळतपणे साखरेचं अधिक सेवन करतात.

त्या पुढे म्हणतात, "यामागील सिद्धांताचा एक भाग असा आहे की जेव्हा तुम्ही रात्री चांगले झोपलेले नसता, तेव्हा तुमच्या मेंदूतील रिवार्ड सेंटर्स दुसऱ्या दिवशी वाढतात. तुम्ही त्यावर लगेच उपाय करू पाहता.

"तुमचा मेंदू तुमची फसवणूक करतो, की ठीक आहे, चटकन ऊर्जा मिळण्यासाठी मला रिफाइंड कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता आहे.

Getty Images

काही जिवाणू आपल्या जैविक चक्रात बदल करून आपल्या झोपेची गुणवत्ता बदलू शकतात

मात्र खराब झोपेला किंवा अपुऱ्या झोपेवर उपाय म्हणून आहाराच्या पद्धतीत बदल करणं हा संपूर्ण मुद्दा नाही.

बेरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आढळलं की ज्या लोकांच्या झोपेच्या पॅटर्नमध्ये बदल नव्हता अशा लोकांच्या तुलनेत ज्या लोकांना सोशल जेट लॅगची समस्या होती, त्यांच्यात नऊ प्रजाती जास्त प्रमाणात होत्या तर आठ प्रजाती कमी प्रमाणात आढळल्या.

मात्र त्यांना आढळलं की यापैकी सूक्ष्मजीवांच्या चार प्रजातींमध्ये फक्त आहारामुळेच मोठे बदल होतात.

झोपेशी सूक्ष्मजीवांचा असतो थेट संबंध

जैम टार्टर, अमेरिकेतील फ्लोरिडामधील नोवा साऊथईस्टर्न विद्यापीठात मानसशास्त्र आणि न्युरोसायन्सच्या प्राध्यापक आहेत. त्या झोईनं केलेल्या अभ्यासात सहभागी नव्हत्या.

त्या म्हणतात की काही विशिष्ट सूक्ष्मजीवांचा झोपेशी थेट संबंध असतो यावर त्यांचा अधिकाधिक विश्वास वाढत चालला आहे. त्या फर्मिक्युट्सचा उल्लेख करतात. हा आतड्यांमध्ये आढळणाऱ्या जिवाणूंच्या सर्वात प्रभावी गटांपैकी एक असतो.

टार्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चाचण्या केल्या. त्यात त्यांनी 40 पुरुषांच्या झोपेची आणि त्यांच्या आतड्यांमधील सूक्ष्मजीवांची चाचणी केली. त्यांना फर्मिक्युट्स जिवाणूचे 15 वेगवेगळे गट आढळले, ज्यांचा वेगवेगळ्या प्रकारे झोपेच्या अनेक पॅटर्नशी संबंध आहे.

टार्टर म्हणतात, "सध्या आपल्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तरं नाहीत. मात्र असं निश्चितपणे दिसतं की काही झोपेत सुधारणा करू शकतात आणि काही झोप बिघडवू शकतात."

Getty Images आतडे किंवा तोंडातील सूक्ष्मजीवांमध्ये निर्माण झालेल्या असंतुलनामुळे देखील झोपेच्या काही समस्या सुरू होऊ शकतात.

काही प्रकरणांमध्ये, झोपेत येणारे व्यत्यय या सूक्ष्मजीवांच्या संख्येत सक्रियपणे बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि सूक्ष्मजीवांचं नियमन करण्याची क्षमता बिघडू शकते. त्यामुळे झोपेच्या दीर्घकालीन समस्या होण्याची शक्यता वाढू शकते.

मात्र टार्टर आणि मार्टिन यांच्यासह संशोधकांनी असं सुचवलं आहे की आतडे किंवा तोंडातील सूक्ष्मजीवांमध्ये निर्माण झालेल्या असंतुलनामुळे देखील झोपेच्या काही समस्या सुरू होऊ शकतात.

त्यांना वाटतं की आपल्या जैविक घड्याळात बदल करून आणि आपल्या आहारात बदल करून काही जिवाणू आपल्या झोपेच्या गुणवत्तेत सक्रियपणे बदल करू शकतात. सर्केडियन रिदम किंवा जैविक घड्याळ म्हणजे आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ जे आपल्या झोपेचं नियमन करतं.

विष्ठेच्या प्रत्यारोपणावरील अभ्यास

याचे काही पुरावे तथाकथित मल किंवा विष्ठा प्रत्यारोपणाशी (फेकल ट्रान्सप्लांट) संबंधित अभ्यासांच्या मालिकेमधून मिळतात.

2024 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात वैज्ञानिकांनी मानवी विष्ठेचं - त्यात आतड्यांमधील सूक्ष्मजीव होते - उंदरांच्या आतड्यांमध्ये प्रत्यारोपित केली. जेटलॅग आणि निद्रानाशाची समस्या असलेल्या लोकांकडून घेतलेली विष्ठा ज्या उंदरांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आली, ते त्यांच्या सामान्य झोपेच्या वेळेत अधिक जागे झाले.

तर दुसऱ्या एका अभ्यासात आढळलं की जेव्हा उंदरांमध्ये जेटलॅगमधून बरे होण्यापूर्वी, दरम्यान आणि बरे झालेल्या मानवांच्या आतड्यातील सूक्ष्मजीव टाकण्यात आले, तेव्हा जेटलॅगच्या टप्प्यात असणाऱ्या मानवामधील सूक्ष्मजीवांचं प्रत्यारोपण केल्यानं त्यांचं वजन वाढलं आणि त्यांना रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला.

Getty Images

चीनमधील संशोधकांनी मानवांवर अनेक लहान स्वरुपातील अभ्यास केले आहेत. त्यामधून दिसून आलं आहे की विष्ठेच्या प्रत्यारोपणामुळे ज्या रुग्णांना गंभीर स्वरुपाचा निद्रानाश आणि झोपेच्या समस्या आहेत, त्यांच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते.

अर्थात हे लक्षात ठेवलं पाहिजे की झोपेशी निगडीत असलेल्या अनेक पैलूंमध्ये मानसिक घटकांचाही समावेश असतो. त्यामुळे विष्ठेचं प्रत्यारोपण करण्यात आलेल्या रुग्णांची मानसिकता अशाप्रकारे बदलण्याची शक्यता असते की त्यामुळे त्यांना अधिक चांगली, शांत झोप येऊ शकेल.

याचा प्रभावीपणा योग्यरितीनं तपासण्यासाठी रँडमपणे करण्यात आलेल्या डबल-ब्लाईंड क्लिनिकल चाचणी करण्याची आवश्यकता असेल, असं संशोधक म्हणतात.

डबल-ब्लाईंड क्लिनिकल चाचणी म्हणजे ज्यात रुग्ण आणि संशोधक या दोघांनाही माहित नसतं की कोणत्या रुग्णाला खरं औषध देण्यात आलं आहे आणि कोणाला फक्त प्लासिबो (मुख्य औषधविरहित घटक) देण्यात आलं आहे.

आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचं संतुलन

मात्र याचा उपयोग होऊ शकतो असं वाटण्यामागे इतरही कारणं आहेत. उदाहरणार्थ, आहाराचा झोपेवर परिणाम होतो हे सर्वज्ञात आहे.

15 निरोगी तरुणांच्या एका गटानं एक आठवडाभर चरबीयुक्त, खूप जास्त साखर असलेलं अन्न घेतलं. यामुळे ते गाढ झोपेत असताना त्यांच्या मेंदूतील इलेक्ट्रिकल पॅटर्न बदलले. अर्थात इतक्या छोट्या नमुन्यावरून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येणं कठीण आहे.

त्याचप्रमाणे, एका प्रयोगात काही जणांनी अँटी-बायोटिक्स घेतल्यानंतर त्यांच्या झोपेचं मूल्यांकन करण्यात आलं. त्यातील पुराव्यांवरून दिसून आलं की यामुळे डोळ्यांची जलद हालचाल नसलेल्या झोपेचं प्रमाण कमी झालं होतं.

हा झोपेच्या चक्रामधील एक आवश्यक भाग असतो. यात शरीराची झीज भरून काढली जाते आणि नवीन स्मृती आणि कौशल्य मजबूत होतात. अर्थात हे निष्कर्ष सर्व अँटीबायोटिक्सना लागू झाले नाहीत आणि तो अभ्यासदेखील छोट्या स्वरुपातील होता.

Getty Images

आपल्या आतड्यांमधील सूक्ष्मजीवांच्या संतुलनात बदल झाल्यास त्यामुळे हे सूक्ष्मजीव तयार करत असलेल्या उपयुक्त रसायानांचं प्रमाणदेखील बदलू शकतं. ही रसायनं आपल्या अन्नाचं विघटन करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे याचा झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, असं टार्टर म्हणतात.

उदाहरणार्थ, आपल्याला माहित आहे की आतड्यांमधील काही सूक्ष्मजीव गामा-अमिनोबुटिरिक, डोपामाइन, नॉरपाइनफ्रिन आणि सेरोटोनिनसारखे न्युरोट्रान्समीटर्स किंवा ब्युटारेट सारखे शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड्स तयार करतात. हे सर्व झोपेच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावतात.

"त्यांची निर्मिती आतड्यांमध्ये होत असली तरी ते मेंदूवर परिणाम करू शकतात," असं टार्टर म्हणतात.

जर या सूक्ष्मजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली तर त्यांचा मेंदूवर होणारा रासायनिक प्रभावदेखील कमी होण्याची शक्यता आहे. तर इन्फ्लेमेटरी रेणूंच्या संश्लेषणासाठी किंवा निर्मितीसाठी सॅच्युरेटेड फॅट आणि साखरेसारखे अन्नपदार्थ वापरणारे इतर सूक्ष्मजीवांची संख्या वाढू शकते.

यातील काही इन्फ्लेमेटरी रसायनं, ज्यात बाईल ॲसिडचा समावेश आहे, मेंदूच्या जैविक घड्याळाची लय बिघडवण्यास किंवा त्यामध्ये व्यत्यय आणण्यास सक्षम असल्याचं मानलं जातं.

तोंडातील सूक्ष्मजीवदेखील बजावतात महत्त्वाची भूमिका

मार्टिन म्हणतात की तोंडातील मायक्रोबायोम म्हणजे सूक्ष्मजीवांच्या बाबतीतदेखील असंच असण्याची शक्यता आहे. ज्या लोकांचा आहार खराब असतो किंवा दातांचे आरोग्य चांगलं नसतं, अशा लोकामध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढल्यामुळे इन्फ्लेमेशनमध्ये वाढ होते.

या लोकांमध्ये ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नियासारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो. यात झोपल्यावर घशाच्या भिंती म्हणजे घशातील स्नायू शिथिल होतात. परिणामी श्वासोच्छवासात व्यत्यय येतो.

"जर शरीरातील सूक्ष्मजीवांचं प्रमाण असंतुलित असेल, तर त्यामुळे स्थानिक आणि सिस्टेमिक इन्फ्लेमेशन होऊ शकतं. त्यामुळे श्वसनाचा मार्ग अरुंद होऊ शकतो. स्ट्रेस हार्मोन्स स्त्रवणं आणि इतर अनेक गोष्टी घडू शकतात, ज्यामुळे झोपेत अडथळा येतो," असं मार्टिन म्हणतात.

अरुंद किंवा अडथळा आलेल्या श्वसनमार्गांमुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया किंवा निद्रानाश आणि घोरण्याची समस्या होऊ शकते.

आतड्यांमधील सूक्ष्मजीव झोपेत भूमिका बजावणारे न्यूरोट्रान्समीटर तयार करतात.

हे सर्व लक्षात घेता, प्रोबायोटिक्स (जिवाणूंच्या लक्ष्य करण्यात आलेल्या उपगटाचं व्यवस्थापन करणाऱ्या गोळ्या) किंवा प्रीबायोटिक्स (न पचणारे अन्न घटक जे निवडकपणे आतड्यातील जिवाणूंना आहार देतात) झोपेच्या काही विकारांवर उपचार करण्यास उपयुक्त ठरू शकतात.

BBC

अरुंद किंवा अडथळा आलेल्या श्वसनमार्गांमुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया किंवा निद्रानाश आणि घोरण्याची समस्या होऊ शकते.

आतड्यांमधील सूक्ष्मजीव झोपेत भूमिका बजावणारे न्यूरोट्रान्समीटर तयार करतात.

हे सर्व लक्षात घेता, प्रोबायोटिक्स (जिवाणूंच्या लक्ष्य करण्यात आलेल्या उपगटाचं व्यवस्थापन करणाऱ्या गोळ्या) किंवा प्रीबायोटिक्स (न पचणारे अन्न घटक जे निवडकपणे आतड्यातील जिवाणूंना आहार देतात) झोपेच्या काही विकारांवर उपचार करण्यास उपयुक्त ठरू शकतात.

प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्सच्या सेवनावरील अभ्यास

टार्टर एका अभ्यासाकडे लक्ष वेधतात. या अभ्यासात दिसून आलं आहे की 94 वैद्यकीय विद्यार्थ्यांचा गट शैक्षणिक वर्षात तणावातून जात असताना प्लासिबोच्या तुलनेत लॅक्टोबॅसिलस केसेई स्ट्रेन शिरोटा या एक विशिष्ट प्रोबायोटिकमुळे झोप कशी सुधारली.

बेरी म्हणतात की झोईनं अळीकडेच बायोम (बीआयओएमई) अभ्यास नावाच्या एका प्रकल्पात युकेमधील 399 निरोगी वयस्कांचा समावेश असलेली सहा आठवड्यांची चाचणी पूर्ण केली.

या संशोधनाचं समपातळीवरील लोकांकडून पुनरावलोकन होतं आहे. या संशोधनात सहभागी झालेल्यांना तीनपैकी एक अन्न मिळालं. एका गटाला 'सूक्ष्मजीवांसाठीचं सुपर इंधन' देण्यात आलं.

Getty Images

ते इंधन किंव अन्न म्हणजे बाओबाब फळापासून ते लायन्स मेन मशरुमपर्यंत 30 हून अधिक वेगवेगळ्या संपूर्ण अन्न घटकांसह असलेलं प्रीबायोटिक मिश्रण.

आणखी एका गटाला एल. रॅमनोसस जिवाणूच्या स्वरुपात दररोज प्रोबायोटिक देण्यात आलं. तर शेवटच्या गटाला प्रीबायोटिक मिश्रणाइतक्याच कॅलरी असलेले ब्रेड क्रुटॉन म्हणजे भाजलेल्या ब्रेडचे तुकडे देण्यात आले.

क्रुटॉन देण्यात आलेल्या गटाच्या तुलनेत, प्रीबायोटिक मिश्रण मिळालेल्या लोकांची झोप मोठ्या प्रमाणात सुधारली. अर्थात हे वस्तुनिष्ठ मोजमापांऐवजी सहभागींनी दिलेल्या स्व-अहवालांवर आधारित होतं.

अशा निष्कर्षांमुळे मार्टिन यांची उत्सुकता वाढली असली, तरीदेखील त्या झोपेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी असल्याचं आधीच ज्ञात असलेल्या प्रीबायोटिक किंवा प्रोबायोटिक उपचारांची तुलना सध्याच्या उपचारांशी करणाऱ्या मोठ्या, अधिक सक्षम चाचण्यांची गरज अधोरेखित करतात.

थेरेपी आणि नव्या संशोधनाची सांगड

यात आकलनाशी निगडीत वर्तणुकीच्या थेरेपी (एक प्रकारची बोलण्याची थेरेपी जी अनेकदा सीबीटी म्हणून ओळखली जाते) आणि विविध औषधांचा समावेश आहे.

"प्रभावी वैद्यकीय थेरेपी किंवा उपचार उपलब्ध आहेत, हे आपल्याला माहित असताना, एखाद्याला ज्या गोष्टीचा प्रभावीपणा सिद्ध झालेला नाही असं काहीतरी विकत घेण्यासाठी हेल्थ फूड स्टोअरमध्ये 30 डॉलर (22 पौंड) खर्च करायला सुचवण्याबाबत मी नेहमीच सावध असते," असं त्या म्हणतात.

ज्या लोकांना कमी तीव्रतेची ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नियाची समस्या आहे, अशांना प्रोबायोटिक्सची मदत होऊ शकते का, हे शोधण्यात त्यांना रस आहे.

संभाव्यपणे सध्या उपलब्ध असलेली तोंडात वापरायची उपकरणं जी श्वासोच्छवासातील अडथळे टाळण्यासाठी जबड्याची स्थिती बदलतात त्यांच्यासह प्रोबायोटिक्स उपयोगी ठरू शकतात हे त्यांना पाहायचं आहे.

Getty Images

दीर्घकाळापासून निद्रानाशाची समस्या असलेले 20-30 टक्के लोक सध्या आकलनाशी संबंधित वर्तणुकीच्या थेरेपीला प्रतिसाद देत नसल्यामुळे, प्रोबायोटिक्स किंवा प्रीबायोटिक्समुळे यात मदत होऊ शकेल का याबाबत मार्टिन यांना आश्चर्य वाटतं.

त्या पुढे म्हणतात, "अशाप्रकारे अभ्यास पाहायला मला आवडेल. वैद्यकीयदृष्ट्या, रुग्णांच्या अशा उपगटाला कशाप्रकारे मदत करायची याबद्दल आम्हाला अडचणी येतात. त्यातील अनेकांना मेंदूच्या क्रिया संथ करणारी औषधं घ्यायची नसतात."

मात्र जर सूक्ष्मजीवशास्त्राचा झोपेच्या गुणवत्तेवर पडताळणीयोग्य परिणाम दिसून आला, तर त्याचा सर्व प्रकारच्या लोकांना फायदा होऊ शकतो.

"सर्केडियन व्यत्यय किंवा जैविक घड्याळात येणारा व्यत्यय हा समाजात सर्रास आढळतो. तो जेटलॅग, विशिष्ट प्रकारचे करियर किंवा नोकरी, जीवनशैली आणि वयाशी निगडीत आजार यामुळे होऊ शकतो. त्यामुळे या उपचाराचा अनेकांना फायदा होण्याची शक्यता आहे," असं राईट म्हणतात.

यामुळे अंथरुणातील किटकांच्या बाबतीत निश्चितच एक नवीन वळण येईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

  • चांगल्या झोपेचं गणित कसं असतं? नेमकं काय खाल्ल्याने शांत आणि निवांत झोप लागते?
  • रात्री चांगली झोप येत नाही म्हणजे मेंदूमध्ये नेमकं काय घडतं? निद्रानाशाची अशी घ्या काळजी
  • झोपेत असताना तोंड उघडं राहणं आजाराचं लक्षण आहे का? असं तोंड उघडं का राहतं?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.