आशिया कप 2025 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग आमनेसामने आहेत. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने बॅटिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 188 धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी ओपनर सेदीकुल्लाह अटल, अनुभवी ऑलराउंडर मोहम्मद नबी आणि अझमतुल्लाह ओमरझई या तिघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. सेदीकुल्लाहने नाबाद 73 धावा केल्या. नबीने 33 धावा जोडल्या. तर अखेरच्या काही षटकात अझमतुल्लाह ओमरझई याने चौफेर फटकेबाजी करत स्फोटक अर्धशतक ठोकलं. ओमरझई याने आशिया कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात इतिहास घडवला.
सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड ब्रेकओमरझई अफगाणिस्तानसाठी या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. ओमरझई याने 21 बॉलमध्ये 252.38 च्या स्ट्राईक रेटने 53 रन्स केल्या. ओमरझई याने 38 धावा या फक्त 7 चेंडूत चौकार आणि षटकाराच्या मदतीने पूर्ण केल्या. ओमरझईच्या टी 20i कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. ओमरझई याने या खेळीत 5 षटकार आणि 2 चौकार लगावले. ओमरझई याने या खेळीदरम्यान मोठा रेकॉर्ड ब्रेक केला.
ओमरझई याने अवघ्या 20 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. ओमरझई यासह टी 20i आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात वेगवान अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. ओमरझई याने भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचा रेकॉर्ड ब्रेक केला. सूर्यकुमार यादव याने 2022 साली 22 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.
सेदीकुल्लाह अटल आणि नबीची फटकेबाजीसेदीकुल्लाह अटल याने 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केल्याने अफगाणिस्तानला 185 पार पोहचता आलं. सेदीकुल्लाह अखेरपर्यंत नाबाद राहिला. सेदीकुल्लाहने 52 बॉलमध्ये 140.38 च्या स्ट्राईक रेटने 73 धावा केल्या. सेदीकुल्लाहने या खेळीत 3 षटकार आणि 6 चौकार लगावले. तर मोहम्मद नबी याने 26 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 33 रन्स केल्या. मात्र या तिघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.
अफगाणिस्तान पाचवा विजय मिळवणार?दरम्यान आतापर्यंत टी 20i आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात अफगाणिस्तान क्रिकेट टीमने 8 सामने खेळले आहेत. अफगाणिस्तान या 8 पैकी 4 सामने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. तर 4 वेळा अफगाणिस्तानला पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता अफगाणिस्तान हाँगकाँगवर मात करत स्पर्धेतील सुरुवात विजयाने करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.