वडीगोद्री : छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी रुग्णायात उपचार घेऊन परतल्यावर मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी (ता. अंबड) ढोल-ताशांच्या गजरात, फुले आणि गुलालाची उधळण करीत स्वागत झाले. महिलांनी औक्षण केले. उपोषणस्थळी जेसीबीद्वारे भव्य हार घालण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. गावात दाखल होताच त्यांनी ग्रामदैवत मारुती, मोहाटा देवीच्या मंदिरात दर्शन घेतले.
ते म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेऊन थेट अंतरवाली सराटीवासीयांना भेटायला आलो. मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. आरक्षणाची लढाई समाजाने जिंकली आहे. यानिमित्त अंतरवाली सराटीत मोठा जल्लोष करण्यात येणार आहे. त्याची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही.
या गावातील गावकऱ्यांनी प्रेम दिले. महिलांनी लढा कायम ठेवला आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. यापूर्वी या गावात लाठीमार होऊनही आंदोलनासाठी खंबीरपणे उभे राहून महिलांनी साथ दिली. आरक्षणाची लढाई ९६ टक्के जिंकली आहे. राज्याच्या सर्व भागांतील मराठा समाज आरक्षणात येईल. शासनाने काढलेल्या ‘जीआर’ मध्ये गडबड झाली तर नेत्यांना गावात येऊ देणार नाही.’’