आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने युएईला पूर्णपणे दाबून टाकलं असंच म्हणावं लागेल. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युएईला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. युएईने पॉवर प्लेमध्ये सावध फलंदाजी केली. दोन गडी गमवून 41 धावा केल्या होत्या. इतकंच काय तर पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराहला तीन चौकार मारले. त्यामुळे युएईचा संघ त्यातल्या त्यात चांगली सुरुवात करून बसला होता. बुमराहने पॉवरप्लेमध्ये तीन षटके टाकली. पण त्याचा सामना युएईच्या फलंदाजांनी बऱ्यापैकी केला. वसीमने बुमराहच्या तिसऱ्या षटकात तीन चौकार मारले. यापूर्वी बुमराहने शेवटच्या वेळी 2016 च्या आशिया कपमध्ये मीरपूर येथे यूएईविरुद्ध टी20 मध्ये पॉवरप्लेमध्ये प्रथम गोलंदाजी करताना तीन षटके टाकली होती. अशी सर्व चांगली सुरुवात असताना कुलदीपने यादवने युएईच्या स्वप्नावर पाणी टाकलं. एकाच षटकात तीन धक्के देत बॅकफूटवर ढकललं.
पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने चेंडू कुलदीप यादवकडे सोपवला. या षटकात चार धावा दिल्या. त्यानंतर सूर्यकुमार विकेटसाठी नववं षटक त्याच्याकडे सोपवलं. या षटकात कुलदीप यादवने युएईच्या मोठ्या धावसंख्येला ब्रेक लावला. पहिल्या चेंडूवर राहुल चोप्राला तंबूत चालता केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धावा आली. तिसरा चेंडूचा सामना करण्यासाठी मोहम्मद वसीम समोर आला आणि निर्धाव चेंडू गेला. चौथ्या चेंडूवर वसीमला झेल बाद करत तंबूत पाठवलं. पाचव्या चेंडूवर हार्षित कौशिकने दोन धावा काढल्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. कुलदीपने अशा एकाच षटकात तीन विकेट काढल्या.
कुलदीप यादवला पुन्हा षटक मिळेपर्यंत युएईचा 9 विकेट गेले होते. त्यानंतर त्याला तिसरं षटक सोपवलं आणी त्याने चौथी विकेट काढली. कुलदीप यादवने 2.1 षटकं टाकत 7 धावा देत 4 गडी तंबूत पाठवले. कुलदीप यादवप्रमाणे शिवम दुबेनेही चांगली गोलंदाजी केली. त्याने 2 षटकात 4 धावा देत तीन गडी तंबूत पाठवले. पॉवर प्लेपर्यंत 2 गडी गमवून 41 धावा होत्या. मात्र त्यानंतर 13.1 षटकात सर्व बाद 57 धावाच झाल्या. म्हणजेच 16 धावात 8 विकेट गेल्या.