Cooking Oil: कधीही होणार नाही हृदयविकाराचा त्रास; खाण्यासाठी वापरा हे तेल
Marathi September 11, 2025 03:25 AM

तेलाशिवाय कोणताही पदार्थ बनत नाही. फास्ट फूड, तळणीचे पदार्थ किंवा अगदी रोजच्या स्वयंपाकात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र मर्यादेपेक्षा जास्त तेलाचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. जास्त तेल वापरल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणारी देशातील सर्वात मोठी संस्था, FSSAI ने तेलाच्या वापराबाबत काही महत्त्वाची माहिती दिली आहे. या संस्थेच्या मते, बहुतेक लोक हे आपण रोज किती तेल वापरतो, कोणत्या प्रकारचे तेल वापरतो याकडे लक्ष देत नाहीत. यामुळेच तेलाचा जास्त आणि चुकीचा वापर होत असल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत.

आता नेमके कोणते तेल खाण्यासाठी योग्य असते? किंवा तेलाचा किती प्रमाणात वापर करावा? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. खरे तर, निरोगी हृदयासाठी नेहमी पॅक केलेले तेल वापरणे चांगले असते. तसेच एकदा वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करताना काळजी घेणे महत्वाचे आहे. नाही तर यामध्ये विषारी घटक तयार होऊ शकतात. प्रत्येक तेलाचा एक ठराविक स्मोक पॉईंट असतो त्यापेक्षा जास्त तेल गरम केल्यास त्याची गुणवत्ता घटते.

पॅक केलेले तेल वापरा
पॅक केलेले कुकिंग ऑइल म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडेल. तर अगदी सोपे आहे बाजारात मिळणारे तेलाचे पाऊच, बाटल्या, कॅन किंवा टिनमध्ये भरून विकले जाणारे तेल, जसे की रिफाइंड, मोहरी, सोयाबीन किंवा सूर्यफूल तेल. हे तेल स्वयंपाकासाठी वापरावे कारण ते सुरक्षित, स्वच्छ आणि सोयीस्कर असते रिफायनिंग आणि गुणवत्ता चाचण्यांच्या प्रक्रियेतून हे तेल तयार केले जाते. त्यामुळे सुट्टे तेल घेण्यापेक्षा हे तेल खाण्यासाठी वापरावे.

तेलाचा पुनर्वापर करण्याची पद्धत
आता FSSAI या संस्थेने एकदा वापरलेले तेल पुन्हा न वापरण्याचा सल्ला दिला असला तरी ते फेकण्याची इच्छा होत नाही. मग अशा वेळी वापरलेले तेल पूर्णपणे गाळून स्वच्छ काचेच्या डब्यात ठेवा. यानंतर तुम्ही ते वापरू शकता. लक्षात ठेवा एकदा वापरलेले तेल 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस वापरू नये.

जास्त तेलामुळे होणारे नुकसान
जेवणात जास्त तेलाच्या वापरामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे लठ्ठपणा वाढतो कारण तेलात भरपूर कॅलरीज असतात. जास्त तेलामुळे कोलेस्टेरॉल वाढते आणि ब्लॉकेज, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारख्या हृदयरोगांचा धोका वाढतो. तळलेले अन्न उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरू शकते. तेलकट अन्न पचण्यास कठीण असते, ज्यामुळे गॅस, आम्लता, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवतात. सतत जास्त तेल खाल्ल्याने त्याचा त्वचेवर आणि केसांवरही परिणाम होतो, ज्यामुळे मुरुमे, पुरळ आणि तेलकट त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.