Nepal Violence : भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये सध्या अराजक माजले आहेत. बोकाळलेला भ्रष्टाचार आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या देशातील तरुणाई रस्त्यावर उतरली. नेपाळच्या या आंदोलनाला जेन झी आंदोलन म्हटले जात आहे. तरुणांचा संतापामुळे या देशात थेट सत्तापालट झाले आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना थेट राजीनामा द्यावा लागलाय. विशेष म्हणजे राष्ट्रपतींनीही राजीनामा देत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. दरम्यान, आता नेपाळमधील या उठावामुळे भारताच्या शेजारी असलेल्या काही देशांतील अराजकांची चर्चा होत आहे. गेल्या चार वर्षांत भारताच्या शेजारी असलेल्या चार देशांमध्ये सत्तापालट झाले आहे. हे देश कोणते आहेत? इथे सत्ता का उलथवून लावण्यात आली होती? हे जाणून घेऊ या…
नेपाळमधील केपी ओली शर्मा यांच्या सरकारने अलिकडेच सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाअंतर्गत फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यासारखे जवळपास सर्वच सोशल मीडिया प्लॅटपॉर्म बंद करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकांत संताप होता. असे असतानाच सरकारने सोशल मीडियाबाबत घेतलेल्या या निर्णयानंतर या संतापाचा कडेलोट झाला आणि हजारो तरुण नेपाळची राजधानी काठमांडूच्या रस्त्यावर आले.
संतप्त तरुणांनी संसदेकडे कूच केले. काही आंदोलकांनी थेट संसदेत घुसून जाळपोळ आणि तोडफोड केली. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर तरुणांच्या या आंदोलनाला आणखी उग्र स्वरुप आले. तरुणांच्या या आंदोलनात 20 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला. तसेच 250 पेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले. नेपाळमधील संतापलेली ही जनता पाहून सरकारने सोशल मीडियावर बंदी घालण्याचा आपला निर्णय मागे घेतला मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. तरुणांनी संसदेनंतर राष्ट्रपतींचे निवासस्थान, पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केला आणि तोडफोड, जाळपोळ केली. आंदोलकांनी मंत्र्यांच्याही निवासस्थानांना आग लावून दिली. काही मंत्र्यांना मारहाण करण्यात आली. तर एका मंत्र्याचे चक्क कपडे फाडण्यात आले. या सर्व घडामोडी लक्षात घेता नेपाळचे गृहमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीदेखील राजीनामा देत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. देशातील बिघडलेली स्थिती लक्षात घेता राष्ट्रपतीदेखील आपल्या पदावरून पायउतार झाले. आता नेपाळमध्ये लष्कराचे राज्य आहे. लवकरच तिथे नव्या पंतप्रधानांची निवड केली जाणार आहे.
अफगाणिस्तान या देशातही अशाच प्रकारचे अराजक माजले होते. त्यातून नंतर या देशावर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली. या देशात 15 ऑगस्ट 2021 रोजी सत्ताबदल झाला. या दिवसाच्या काही काळ अगोदर तालिबानने आक्रमक पवित्रा धारण केला होता. या देशातील सत्ता काबीज करताना तालिबानने दिवसाढवळ्या रस्त्यांवर गोळीबार केला होता. राष्ट्रपतींच्या निवासस्थानात घुसून तोडफोड केली होती. सामानाची लूट केली होती. या देशातून अमेरिकी सैनिकांनी काढता पाय घेतल्यानंतर तालिबान संघटनेने आक्रमक पवित्रा धारण करत तेथील सत्ता ताब्यात घेतली. सध्या इथे तालिबानचे शासन आहे.
नेपाळप्रमाणेच श्रीलंका या देशातही वाढलेली महागाई, भ्रष्टाचार यामुळे जनतेत अस्वस्थता होती. तिथे सरकारविरोधात जनमत तयार झाले होते. त्यातूनच लोकांनीच इथली सत्ता उलथवून लावली होती. 9 जुलै 2022 रोजी हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले होते. हे आंदोलक बघता-बघता श्रीलंकेच्या राष्ट्रपतीभवनात घुसले होते. आंदोलकांनी तिथे जाऊन मोठी नासधूस केली होती. तोडफोड केली होती. लोकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांना आपल्या पदाचा राजीमाना द्यावा लागला होता.
हे सत्तांतर सैन्याच्या मदतीने झाले नव्हते. तर लोकांनीच संतापाच्या भरात हा उठाव केला होता. या उठावाला ‘अरागलाया’ म्हणजेच संघर्ष असे म्हटले जाते. आर्थिक संकट, भ्रष्टाचार, वाढलेली महागाई याला विरोध करत आंदोलकांनी श्रीलंकेतील सरकार खाली खेचले होते. या आंदोलनानंतर अनुरा कुमारा दिसानायके यांची श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली होती.
बांगलादेशातही अशाच प्रकारे लोकांच्या संतापाचा कडेलोट झाल्यामुळे सत्तांतर घडून आले होते. तिथे 5 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थ्यांनी नेतृत्व केलेल्या एका मोठ्या आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. संतप्त आंदोलक थेट पंतप्रधानांच्या गणभवन या निवासस्थानात घुसले होते. आंदोलकांनी यावेळी पंतप्रधानांच्या निवासस्थानाची तोडफोड केली होती. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांना देशातून पळ काढावा लागला होता. या आंदोलनात पंतप्रधानांच्या निवासस्थानातील महागडे सामान पळवले होते. या आंदोलनामुळे बांगलादेशातील आवामी लीग या पक्षाचे अस्तित्त्वच संपुष्टात आले. शेख हसीना यांची तेथे 15 वर्षांपेक्षा अधिक काळ सत्ता होती. आंदोलकांनी ही सत्ता उलथवून लावली होती. शेख हसीने यांनी देशातून पळ काढताच तेथील लष्करप्रमुखांनी देशाला संबोधित करत लवकरच काळजीवाहू सरकारची स्थापना केली जाईल, असे जाहीर होते.
दरम्यान, गेल्या चार वर्षांत भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि आता नेपाळ अशा एकूण चार देशांत सत्ता उलथवून लावण्यात आली. त्यामुळे अफगाणिस्तान वगळता तरुण, नागरिक यांच्यात किती ताकद असते हेच दिसून आले. त्यांच्या संतापाचा कडेलोट न होऊ देता सरकारने आपले धोरण आखायला हवे, हेही यातून अधोरेखित झाले.