बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी धक्कादायक पाऊल उचलत थेट आयुष्य संपवले. आपल्या चारचाकी गाडीमध्येच त्यांनी गोळी झाडून आयुष्याचा शेवट केला. पोलिसांनी या प्रकरण कला केंद्रात डान्स करणारी नर्तकी पूजा गायकवाड हिला ताब्यात घेतले असून गुन्हाही दाखल केलाय. मात्र, गोविंद बर्गे यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसलेला असताना आता नातेवाईकांनी थेट मोठा खुलासा केला. नातेवाईकांनी केलेल्या या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण आल्याचे बघायला मिळतंय. गोविंद हा आत्महत्या करूच शकत नसल्याचा दावा त्यांच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाने केला.
गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी म्हटले की, आमच्या सरपंचांना वैराग पोलिसांकडून फोन आला आण त्यांनी सांगितले की, तुमच्या गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी त्यांच्याच चारचाकी गाडीमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडली आणि त्यांचे निधन झाले. आम्हाला या घटनेची माहिती कळताच आम्ही लगेचच सासुरे गावाकडे धाव घेतली. आम्ही तिथे ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी त्याच्या गाडीची पूर्ण बॅटरी उतरली होती. हे आम्हाला गेल्यावरच संशयास्पद वाटले.
गोविंदने त्याच्या अख्ख्या आयुष्यात कधी त्याच्याजवळ साधी काठीही ठेवली नाही मग त्याच्याकडे बंदूक कुठून आली. मुळात म्हणजे आमच्या गोविंदकडे कधी बंदूक नव्हतीच. बरोबर काल रात्रीच त्याच्याजवळ ही बंदूक कशी? गोविंदने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आलीये, असा दावा नातेवाईकांकडून केला जातोय. आता नातेवाईकांच्या या दाव्यानंतर प्रकरणाला वेगळेच वळण आल्याचे बघायला मिळतंय. आता प्रश्न उपस्थित राहतोय की, गोविंदने आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आलीये.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपाल केला जातोय. कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पूजा आणि गोविंद यांच्यामध्ये मागील दीड वर्षांपासून प्रेम संबंध होते आणि गेवराईतील बंगला नावावर करण्यासाठी ती गोविंदवर दबाव टाकत होती. फक्त हेच नाही तर आतापर्यंत गोविंदने महागडे सोन्याचे दागिने आणि मोठा पैसा हा तिला दिल्याचे सांगितले जाते.