एकाच दिवशी चार चोरीचे गुन्हे दाखल
esakal September 11, 2025 06:45 AM

पालघर, ता. १० : तलासरी, डहाणू, वाडा आणि पालघर पोलिस ठाण्यात एकाच दिवशी चार चोरीच्या गुन्ह्यांची तक्रार दाखल करण्यात आली आहे. चारही गुन्हे अज्ञात चोरांविरुद्ध दाखल केले आहेत. टेम्पो, मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी यासह दुचाकी चोरीचे हे गुन्हे आहेत.

दापचारी गावामध्ये २२ लाखांचा टेम्पो पळवून नेल्याची घटना घडली. टेम्पोसह टेम्पोच्या चालकाचेही अपहरण झाल्याची तक्रार राम यादव यांनी तलासरी पोलिस ठाण्यात केली. याप्रकरणी चोरीसह अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणूतील सरावली आणि आंबेवाडी या परिसरामध्ये मोबाईल टॉवरच्या ७० हजारांच्या बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रतीश घरत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डहाणू पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद सोमवारी (ता. ८) केली गेली. वाडा, शिवाजीनगर, पालसई, आबिटघर, वडवली आणि बालिवली गावामध्ये ११ जानेवारी ते २६ ऑगस्टदरम्यान चोरट्यांनी मोबाईल टॉवरच्या एक लाख २५ हजारांच्या बॅटऱ्या चोरून नेल्याप्रकरणी निशांत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पालघर पोलिस ठाणेअंतर्गत देवी सहाय रोड परिसरात अंबामाता मंदिर भागातून दुचाकी चोरीचा प्रकार घडला आहे. गणेश कुमार हरीश सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.