Bollywood News : क्युरियस आयज सिनेमाच्या बॅनरखाली निर्मित होणारा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मन्नू क्या करेगा?’ १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील संगीत आधीच लोकप्रिय ठरले असून ‘हमनवा’, ‘तेरी यादें’ आणि ‘सैयाँ’ ही गाणी चर्चेत आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी देहरादूनच्या सुंदर लोकेशन्सवरून मिळालेल्या अनुभवांबद्दल कलाकारांनी आपली भावना व्यक्त केली.
या चित्रपटातून पदार्पण करणारा अभिनेता व्योम म्हणाला, “मी यात एक मस्तमौला आणि आयुष्याचा आनंद घेणाऱ्या मुलाची भूमिका केली आहे. देहरादूनमध्ये शूटिंग करणं ही एक अनोखी अनुभूती होती. पहिल्याच चित्रपटात दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.”
अभिनेत्री साची बिंद्रा हिने देखील आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, “ही फिल्म माझ्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखी आहे. यात संगीत, आत्मा, मोठं स्केल आणि गहन भावना आहेत. प्रेक्षकांना हाही अनुभव आवडेल, असा मला विश्वास आहे.”
चित्रपटाचे दिग्दर्शक संजय त्रिपाठी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “मन्नू क्या करेगा? ही केवळ लव्ह स्टोरी नाही, तर ही एक प्रवासकथा आहे—मैत्री, अपयश, स्वतःचा शोध आणि प्रेमाच्या शुद्ध स्वरूपाचा अनुभव देणारी.”
या चित्रपटात व्योम आणि साची यांच्यासोबत विनय पाठक, कुमुद मिश्रा, राजेश कुमार आणि चारु शंकर यांसारखी दमदार कलाकारांची फळीही आहे. या चित्रपटाचे संगीत ललित पंडित यांनी दिले असून ते आधीच हिट ठरले आहे. ट्रेलरला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद पाहता, ‘मन्नू क्या करेगा?’ या नव्या चेहऱ्यांच्या एन्ट्रीसोबत प्रेक्षकांसाठी भावनिक आणि रंगतदार सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.
स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत होणार डॅशिंग हिरोची एंट्री; 'नशीबवान' मध्ये 'हा' अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत