जीएसटी कमी झाल्याने कोणती Royal Enfield बाईक होईल स्वस्त आणि महाग?
GH News September 11, 2025 05:11 AM

देशात रॉयल एनफील्ड बाइक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेता अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये उत्तमोत्तम बाईक ऑफर करत असतात. त्यातच भारतात जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर बाईक स्वस्त होणार आहेत, परंतु 350 सीसीपेक्षा जास्त इंजिन असलेल्या बाइक्सवर कर वाढवण्यात आला आहे. आता या रॉयल एनफील्ड बाइक्सवर अधिक जीएसटी आकारला जाणार आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 350 सीसी इंजिनपासून सुरू होणाऱ्या बाइक्स आहेत. त्यामुळे रॉयल एनफील्ड बाइक्स महाग असतील की स्वस्त? ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.

या बाईकची किंमत होईल कमी

रॉयल एनफील्ड ही सर्वात लोकप्रिय मोटरसायकल ब्रँडपैकी एक आहे. कंपनीवर जीएसटी 2.0 चा संमिश्र परिणाम दिसून येत आहे. हंटर 350, क्लासिक 350, मेटीओर 350, बुलेट 350 आणि गोवन क्लासिक 350 सारख्या 350 सीसीच्या बाईकचे इंजिन 349 सीसी असल्याने कंपनीच्या बाइक्सवरील जीएसटी आता कमी करण्यात आला आहे. यामुळे या बाइक्स पूर्वीपेक्षा स्वस्त होतील आणि नवीन खरेदीदार आणि रायडर्ससाठी अधिक परवडणाऱ्या होतील.

या बाईक महाग असतील

दुसरीकडे रॉयल एनफील्डच्या काही मोठ्या बाइक्स महाग होणार आहेत. यामध्ये हिमालयन 450, गुरिल्ला 450, स्क्रॅम 440 आणि 650 सीसी सिरीज सारख्या मोटारसायकलींवर जास्त जीएसटी भरावा लागेल. कारण या बाईक्सचे इंजिन 350 सीसीपेक्षा जास्त असल्याने त्यांच्या किमती वाढतील. या बदलाचा परिणाम वेगवेगळ्या सेगमेंटच्या विक्री आणि मागणीवर होईल.

कोणत्या बाईकवर किती GST लागेल?

350 सीसी पेक्षा कमी इंजिन असलेल्या बाइक्सवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आले आहे. रॉयल एनफील्डच्या विक्रीपैकी सुमारे 87% विक्री या सेगमेंटमधून होते. किमती कमी झाल्यामुळे, या बाइक्स आता आणखी परवडणाऱ्या होतील. विशेषतः पहिल्यांदा खरेदी करणाऱ्या आणि दररोज रायडर्ससाठी खरेदी करणे सोपे होईल. दुसरीकडे, कंपनीच्या हिमालयन, गुरिल्ला, स्क्रॅम सारख्या 400सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या बाइक्स आणि इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल जीटी सारख्या 650 सीसी मालिकेतील बाइक्सवरील जीएसटी 28% वरून 40% पर्यंत वाढवण्यात आला आहे. आता प्रीमियम आणि अॅडव्हेंचर-टूरर बाइक्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या खरेदीचे नियोजन करताना ही वाढलेली किंमत लक्षात ठेवावी लागणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.