शहरात आज पाणीसंकट
esakal September 12, 2025 05:45 AM

वसई, ता. ११ (बातमीदार) : मुसळधार पाऊस झाल्याने वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या तिन्ही धरणांत मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे, मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी (ता. १२) शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होण्याची भीती आहे.

वसई-विरार महापालिकेला सूर्या धरणाच्या जुन्या आणि नवीन या दोन योजनांतून, तसेच एमएमआरडीएच्या सूर्या योजनेतून पाणीपुरवठा होतो. सूर्या धरणाची नवीन योजना व एमएमआरडीएच्या सूर्या योजनेचा पाणीपुरवठा तांत्रिक देखभाल-दुरुस्ती, तर सूर्या धरणाच्या जुन्या योजनेच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असणाऱ्या ढेकाळे वरई फाटा येथे असलेल्या जुनी जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. त्यामुळे या जोडणीचे काम केले जाणार असल्याने शुक्रवारी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत वेळेत दोन्ही योजनांतून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना जलसमस्या निर्माण होणार आहे.

जुन्या योजनेतील पाणी तीन दिवस बंद
वसई-विरार महापालिकेचा जुन्या योजनेचा पाणीपुरवठा रविवारी (ता. ११) सकाळी १० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यानंतर काम पूर्ण झाल्यावर वितरण सुरळीत सुरू होणार आहे, तोपर्यंत शहरातील पाणीपुरवठा अनियमित आणि कमी प्रमाणात होईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापराने, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.