चिंचवड, ता.२६ ः गेल्या आठवडाभरापासून चिंचवडच्या चाफेकर चौकातील उघडे गटार धोकादायक ठरत आहे. जड वाहने त्यावरून गेल्यामुळे त्याचे झाकण तुटून खाली पडले असून तेथून जाणाऱ्या वाहनचालकांसाठी व पादचाऱ्यांसाठी मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, संबंधित विभागाने अद्याप याकडे दुर्लक्ष केलेले दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
चापेकर चौक हा चिंचवडमधील महत्वाचा व गजबजलेला चौक आहे. येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या चौकातून दुचाकी, चारचाकी तसेच सार्वजनिक वाहतुकीची साधने दिवसरात्र धावत असतात. मात्र, उघड्या गटारामुळे वाहन त्यामध्ये अडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः रात्रीच्यावेळी आणि पावसात पाणी साचल्यावर हा धोका अधिक वाढत आहे. सध्या तेथे नागरिकांनी लोखंडी बॅरिकेड्स उभे केले आहे. मात्र, प्रशासनाकडून वेळीच लक्ष न दिल्यास एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त करत आहेत. तसेच तातडीने गटाराचे झाकण बसवून अपघात टाळण्याची मागणी केली असून प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,अशी अपेक्षा आहे.
CWD25A02017