किवळे, ता.११ : प्राधिकरण परिसरातील विविध भागांत दररोज मांसाहारी पदार्थांचे तुकडे फेकून दिले जात असल्याने परिसरातील भटके श्वान व कावळे आक्रमक होत आहे. त्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकांत संताप असून महापालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दररोज एक अज्ञात व्यक्ती अशा पद्धतीने मांसाचे तुकडे टाकत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरते. तसेच श्वान-कावळे हिंस्त्र होण्याचा धोका वाढतो, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिसांकडे देण्यात आली असून, लवकरच संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.