जुन्नर, ता. ११ : नारायणगाव- जुन्नर रस्त्यावर बादशहा तलाव (ता. जुन्नर) येथे चार चाकी वाहनास पाठीमागून धडक देऊन पळून गेलेल्या उदय बाळासाहेब भोपे याच्याविरुद्ध जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बादशाह सय्यद कासम इनामदार (रा. मंचर, ता. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा भाचा फरीद महंमद इनामदार हा सोमवारी (ता. ८) रात्री मारुती सुझुकी ईको मोटारीत (क्र. एमएच १४ एफएम ५३७४) असताना भोपे चालवत असलेल्या एर्टिगा मोटारीने (क्र. एमएच १४ जीएन ८२८३) वेगात येत पाठीमागून धडक दिली. यात मोटारीतील फरिद इनामदार, नाझिया इनामदार, लुमान इनामदार, निषाद इनामदार यांच्या हातापायाला किरकोळ व गंभीर दुखापती झाल्या. तसेच, मोटारीचे नुकसान झाले. मात्र, अपघातातील जखमींना उपचार करण्यासाठी घेऊन न जाता भोपे पळून गेला. त्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.