गर्भश्रीमंती स्वयंपाकघरातील
esakal September 12, 2025 03:45 PM

डॉ. मालविका तांबे

मध्यंतरी एका लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने एका नातेवाइकाकडे जाण्याचे झाले. तेथे गेल्यावर लहान मुलांशी संवाद साधत असताना जाणवले की प्रत्येक मुलाला महागडी गाडी कुठली आहे, कोणाकडे आहे याबद्दलचे कौतुक होते व त्याबद्दलची माहितीही होती. परंतु याच मुलांना तुमचा आवडता पदार्थ कोठला? असे विचारल्यावर पिझ्झा, बर्गर, फ्राइज वगैरे मोजक्या ४-५ पदार्थांची नावे पुढे आली. पुरणाची पोळी, उकडीचे मोदक, गव्हाचा चीक, तूप-मेतकूट-भात सारखे पदार्थ सुचवल्यावर कोणाच्याही चेहऱ्यावर फारशी ओळखही दिसत नव्हती. आधुनिक समाजात सगळीकडे श्रीमंती वाढते आहे असे निदर्शनास येत असताना समृद्धी व गर्भश्रीमंती मात्र कमी होत आहे याचे हे द्योतक आहे.

आपल्याकडे सांगण्यास आलेले आहे ‘आरोग्यं धनसंपदा’ अर्थात आरोग्य हेच आपले खरे धन वा संपत्ती आहे. ज्या व्यक्तीचे स्वयंपाकघर गर्भश्रीमंत असेल अर्थात जेथे रोज प्रेमाने, सद्भावाने, चांगल्या प्रतीच्या गोष्टी वापरून, विचारपूर्वक योजना करून, कोणाला काय हवे आहे, नको आहे हे पाहून, प्रकृतीचा विचार करून स्वयंपाक होत असेल ते घर खरे श्रीमंत आहे असे म्हणता येईल. बऱ्याचदा लोकांचा असा गैरसमज असतो की घरचे अन्न स्वस्त असते, बाहेर जाऊन खाणे महाग पडते. परंतु खरे तर आपल्या मिळकतीचा मोठा भाग स्वयंपाकघरावर खर्च केला तर भविष्यात होणारे बरेच खर्च कमी व्हायला मदत मिळते. त्यामुळे आयुष्यात इतर गोष्टींबाबत काटकसर केली तरी स्वयंपाकघरात मात्र काटकसर करू नये. गर्भश्रीमंत स्वयंपाकघरात कोणत्या गोष्टी असणे आवश्यक असते हे आपण बघू या.

१. सेंद्रिय अन्न ः आरोग्यसंपन्न जीवन हवे असले तर नैसर्गिक शेती, नैसर्गिक पिके याला पर्याय नाही. सध्या अनेक संशोधनांअंती असे दिसून येते आहे की, जास्त पीक मिळण्याच्या दृष्टीने केलेले हायब्रीड अन्न, चुकीच्या शेतीच्या पद्धती वगैरेंनी केवळ पर्यावरणाचा ऱ्हास होतो असे नव्हे तर त्यातून मिळणाऱ्या पिकांमुळे कित्येक पिढ्यांचे आरोग्य खराब होत आहेत. शेतात कीटकनाशके वापरणे, रासायनिक खते वापरणे हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरते. तथापि अशा प्रकारे तयार केलेल्या पिकांचे उत्पादन जास्त येत असल्यामुळे ती तुलनेने स्वस्त असतात. त्याऐवजी सेंद्रिय धान्य पिकवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा भाव जास्त असतो. किचनचे बजेट करत असताना सेंद्रिय गोष्टी विकत घेतल्या जातील याचा प्रत्येकाने आग्रह धरावा. तसेच सेंद्रिय भाज्या, सेंद्रिय फळे बाजारात थोड्या चढ्या दरात उपलब्ध असतात, त्यांचाही वापर आरोग्याच्या दृष्टीने अधिक योग्य ठरतो.

येथे अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे फार्मर्स मार्केटला गेल्यावर अनेकजण शेतकऱ्याशी दरासाठी हुज्जत घालतात व आपल्याला कमी दरात तिथल्या गोष्टी मिळाव्यात असा आग्रह धरतात. त्या विरुद्ध ऑनलाइन मागविलेल्या गोष्टींचा किंवा मॉलमध्ये घेतलेल्या गोष्टींचा दर कमी करता येत नाही. खरे तर जो शेतकरी वर्षभर मेहनत करून आपल्यासाठी पीक उगवतो त्याला थोडे जास्त पैसे देऊन त्याच्याकडच्या भाज्या-धान्य-फळे घेतली तर काहीच हरकत नसावी. दान फक्त धर्मादाय संस्थांमध्ये जाऊन करायचे असते असे नसते, तर तळपत्या उन्हात उभा असलेला शेतकरी दानाचा तितकाच अधिकारी आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. शेतकरी आपला अन्नदाता आहे. जेवण सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे ‘अन्नदाता सुखी भव’ असे म्हणण्याची पद्धत आहे, ते म्हणणे आपल्या वागणुकीतही कोठेतरी येणे अत्यंत आवश्यक आहे.

स्वयंपाकघरांमध्ये चांगल्या प्रतीच्या गोष्टी तयार करायच्या असतील तर त्यासाठी थोडा वेळ देणे आवश्यक असते. ज्या व्यक्तीला स्वतःसाठी थोडाही वेळ मिळू शकत नाही त्या व्यक्तीकडे करोडो रुपये असले तरी काही अर्थ नसतो. सुट्टीच्या दिवशी परिवाराच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन हळद, गरम मसाला, गोडा मसाला, धणे पूड, जिरे पूड, लाल तिखट, सांबार मसाला, वेगवेगळ्या चटण्या, लोणची, पापड वगैरे गोष्टी कराव्या. या गोष्टी व्यवस्थित नियोजन करून व एकत्र येऊन केल्या तर यासाठी फारसा वेळ लागत नाही. परंतु या गोष्टींची गुणवत्ता निःसंशय अधिक चांगली असते. बाहेरून घेतलेल्या मसाल्यांमध्ये कुठलातरी रासायनिक रंग, रासायनिक डाय, प्रिझर्वेटिव्हज् तसेच भेसळ असण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेरचे मसाले जेवढे टाळता येतील तेवढे ते आरोग्यासाठी उत्तम ठरते.

२. सुवर्ण ः आयुर्वेदात तान्ह्या बाळापासून प्रत्येकालाच सुवर्णप्राशन अत्यंत महत्त्वाचे सांगितलेले आहे. सुवर्णाने प्रतिकारशक्ती वाढते, दीर्घायुष्य मिळते, हृदयाला मदत होते, पचन सुधारते, शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडायला मदत मिळते, श्र्वसनसंस्था, हाडे, सांधे, वीर्यशक्ती, स्वर व त्वचा सुधारायला मदत मिळते. तसेच बुद्धिमत्ता वाढण्यासाठी, मज्जासंस्थेला मदत करण्यासाठी व मानसिक बल मिळण्यासाठी सोन्याची मदत होऊ शकते. लहान मुलांसाठी सुवर्ण अत्यंत उत्तम सांगितलेले आहे. एका निश्र्चित मात्रेत प्रत्येकाने सोने घेणे गरजेचे असते. अर्थातच सोने महाग असते, परंतु त्याची घेण्याची मात्रा सुद्धा अगदी कमी असते. इतरत्र कुठे वायफळ पैसे घालविण्याऐवजी आपल्या रोजच्या दिनचर्येत संतुलन अमृशर्करायुक्त पंचामृत नियमाने घेतले तर केवल सोनेच नाही तर केशरासारखा महत्त्वाचा घटक रोज पोटात जायला मदत मिळते. लहान मुलांना रोज नियमाने बालामृत देणे चांगले असते. केशरही महाग असले तरी खूप महत्त्वाचे असते, ते रोज पोटात जाणे अपेक्षित असते. घरात जी काही चांदीची भांडी असतील ती अधून मधून वापरणे उत्तम. घरातील सगळ्यांनी रोज सुवर्णसंस्कारित जल घ्यावे.

कष्ट करून कमावलेल्या पैशांमधून सुवर्ण व चांदीसारख्या नोबल मेटल्सचा वापर स्वतःसाठी करता आला तर ती खरी गर्भश्रीमंती. पैसा कमवून दागिने करायचे व ते लॉकरमध्ये ठेवून पुढच्या पिढीला देऊन जायचे ही श्रीमंती नव्हे.

३. पंचामृतात दूध, दही व तूप हे तीन दुग्धजन्य घटक असतात. पूर्वीच्या काळी ज्याच्या घरी गाई-म्हशी जास्त असायच्या त्याला धनवान वा समृद्ध म्हटले जायचे. घरचे चांगले ताजे दूध मिळणे, घरी विरजलेले ताजे दही खायला मिळणे, घरचे ताक रोज जेवणात असणे, तसेच योग्य पद्धतीने घरी केलेले साजूक तूप खायला मिळणे खूप महत्त्वाचे असते. सर्व स्निग्ध पदार्थांमध्ये तूप उत्तम असते आजच्या काळात सप्रयोग सिद्ध झालेले आहे. त्यामुळे ज्या घरच्या बालगोपाळांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना दूधदुभते नियमाने मिळत असेल ते घर गर्भश्रीमंत आहे असे म्हणावे लागेल.

४. आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या मेव्याचा समावेश असणे फळे व भाज्यांप्रमाणेच आवश्यक असते. रोज २-३ भिजवलेले बदाम, अर्धा अक्रोडाचा गर, २-४ काजू, चांगल्या प्रतीचा खजूर, सुके अंजीर, काळ्या मनुका यापैकी जमत असेल ते नक्की खाण्यात ठेवावे. हे जमत नसेल तर निदान भाजलेले शेंगदाणे, जवसाची चटणी, तीळ, खोबरे, कलिंगड-खरबूज-भोपळ्याच्या बिया यांचाही वापर रोजच्या आहारात करावा.

५. पंचामृतात साखर खूप महत्त्वाची सांगितलेली आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीची साखर उचित प्रमाणात वापरता येणे हेही एक समृद्धीचे एक लक्षण आहे.

६. मध एन्झाइम्सने परिपूर्ण असते व पचनाला मदत करते. या शरीरातील प्रत्येक चयापचय क्रियेत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या हातभार लागत असतो. त्यामुळे प्रत्येकाने मध आवर्जून खावे.

आरोग्यसंपदा हवी असेल तर बाहेर खाऊन चुकीच्या गोष्टींमध्ये आपल्या पैशांचा व्यय करण्याऐवजी घरात चांगल्या गोष्टींसाठी युक्तिपूर्वक पैसे वापरणे, स्वयंपाकघरात चांगल्या कृती बनवून सेवन करणे, प्रेमळ व सात्त्विक वातावरणात सात्त्विक आहार संपूर्ण कुटुंबाने घेणे, यासारखी दुसरी गर्भश्रीमंती नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.