महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी मोठी योजना! ४२२ रुपये भरा अन् दोन लाखांचे उपचार मोफत मिळवा; २० रुपयांत एक लाखाचे, ६२ रुपयांत पाच लाखांचे विमा कवच
esakal September 13, 2025 09:45 PM

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य शासनाच्या निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने संलग्नित १०९ महाविद्यालयांसह विद्यापीठातील संकुलातील विद्यार्थ्यांसाठी विमा योजना सुरू केली आहे. स्वामी विवेकानंद विमा योजनेतून विद्यार्थ्यांना एक ते पाच लाखांपर्यंत विमा कवच मिळणार आहे. त्यात अपघात, अपघाती मृत्यू व वैद्यकीय उपचारासाठीची मदत असणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत दरवर्षी अंदाजे ७२ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या सुरक्षेसाठी चालू शैक्षणिक वर्षापासून स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना शासनाने सुरू केली आहे. ही विमा योजना ऐच्छिक असून त्यासाठी तीन विमा कंपन्यांची नावे विद्यार्थ्यांना कळविली आहेत. त्यात २०, ६२ आणि ४२२ रुपयांचा प्रिमिअम असल्याचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी सर्व महाविद्यालयांना कळविले आहे. विमा कवच एक वर्षासाठीच असणार आहे.

तत्पूर्वी, विद्यापीठाने ११८ रुपये घ्यायला सांगितले होते, त्यानुसार अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून तेवढी रक्कम प्रवेशावेळी घेतली. पण, आता प्रिमिअमचे तीन टप्पे असल्याने विद्यार्थ्यांकडून आणखी पैसे घ्यावे लागतील किंवा जास्त झालेले पैसे परत करावे लागणार आहेत.

अशी आहे विमा योजना

  • २० रुपयांचा प्रिमिअम भरलेल्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत दिली जाते

  • ६२ रुपये प्रिमिअम भरलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना अपघाती मृत्यूनंतर पाच लाख रुपयांची मदत मिळते

  • विद्यार्थ्यांनी ४२२ रुपयांचा प्रिमिअम भरल्यास त्यांना या योजनेत कोणत्याही आजारपणात वैद्यकीय उपचारासाठी दोन लाखांची मदत दिली जाते

ही योजना ऐच्छिक असून एक विद्यार्थी तिन्ही प्रिमिअम भरू शकतो

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आदेशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विमा योजना सुरू केली आहे. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ऐनवेळी अडचणींमुळे वेळेत उपचार घेण्यास अडचणी येतात. त्यामळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा म्हणून संलग्नित सर्व महाविद्यालयांना पत्राद्वारे कळविले आहे. ही योजना ऐच्छिक असून एक विद्यार्थी तिन्ही प्रिमिअम भरू शकतो किंवा एक-दोन देखील भरू शकतो. - डॉ. केदारनाथ काळवणे, संचालक, विद्यार्थी विकास विभाग, सोलापूर विद्यापीठ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.